Viral Post: आयटी क्षेत्रातील भीषण वास्तव! वर्षाला केवळ 9 रुपयांची पगारवाढ; हताश इंजिनिअरची पोस्ट तुफान व्हायरल

WhatsApp Group

IT engineer 9 rupees salary hike viral post: सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हटलं की डोळ्यांसमोर मोठी पॅकेजेस आणि सुखवस्तू जीवन येते. मात्र, दिल्लीतील एका नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) काम करणाऱ्या एका तरुणाने सोशल मीडियावर मांडलेली व्यथा आयटी क्षेत्रातील शोषणाचे विदारक चित्र समोर आणते. गेल्या वर्षी केवळ ९ रुपयांची पगारवाढ मिळालेल्या या इंजिनिअरला यंदा तर तेवढीही वाढ मिळालेली नाही, ज्यामुळे त्याचे ‘करिअर’ आता त्याला ओझं वाटू लागलं आहे.

९ रुपयांची पगारवाढ आणि कंपनीचा जाचक कारभार

दिल्ली एनसीआरमधील एका नामांकित आयटी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या या तरुणाने ‘r/IndianWorkplace’ या सबरेडिटवर आपली व्यथा मांडली आहे. त्याने सांगितले की, २०२४ मध्ये तो ४.२५ लाखांच्या पॅकेजवर या कंपनीत इंटर्न म्हणून रुजू झाला होता. त्यानंतर त्याचे प्रमोशन झाले, मात्र हातात येणारा पगार अपेक्षेपेक्षा खूपच कमी होता. २०२५ च्या इंक्रीमेंट सायकलमध्ये त्याला केवळ ९ रुपयांची वाढ देण्यात आली आणि २०२६ मध्ये तर तीही नाकारण्यात आली. “मी एखाद्या गुलामासारखं काम करत आहे,” अशा शब्दांत त्याने आपला संताप व्यक्त केला आहे.

I so done with this company and colleagues…
by
u/Downtown_Reserve_678 in
IndianWorkplace

बॉन्ड आणि नोटीस पिरियडचा फास

या इंजिनिअरने कंपनीच्या जाचक अटींचाही उल्लेख केला आहे. कंपनी सोडण्यासाठी त्याला २ वर्षांचा बॉन्ड पूर्ण करावा लागेल किंवा १.५ लाख रुपये भरावे लागतील. एवढेच नाही तर, ही रक्कम भरूनही त्याला ६ महिन्यांचा नोटीस पिरियड पूर्ण करणे बंधनकारक आहे. “मार्केट डाउन असल्यामुळे आणि कॉलेजमधून नवीन बाहेर पडलो असल्याने दुसरा पर्याय नसल्याने मला ही कंपनी जॉइन करावी लागली,” असे त्याने नमूद केले.

पगारवाढ तर नाहीच, उलट खिशातूनच कापले जातात पैसे

या टेक प्रोफेशनलने ऑफिसमधील आणखी एका मुद्द्यावर प्रकाश टाकला आहे. तो क्लायंटला भेटण्यासाठी स्वतःच्या खर्चाने प्रवास करतो, पण कंपनी त्याला कोणताही ट्रॅव्हल अलाउन्स देत नाही. उलट, कंपनीच्या मेन कॅम्पसपर्यंत जाणाऱ्या ‘शटल’ बससाठी कर्मचाऱ्यांच्या पगारातून मोठी रक्कम कापली जाते. जेव्हा त्याने प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा कंपनीने त्याचा कामाचा ‘ग्रेड’ खराब करून त्याला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली.

आयटी क्षेत्रातील संथ पगारवाढ

या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने त्याला सल्ला दिला की, “कंपनी केवळ स्वस्त मनुष्यबळ शोधत आहे, तुम्ही तुमच्या कौशल्यावर (Skills) लक्ष केंद्रित करा.” सध्या भारतात ऑटोमेशन आणि खर्चात कपात करण्याच्या धोरणामुळे आयटी सेक्टरमध्ये पगारवाढीचा वेग मंदावला आहे. याउलट, ई-कॉमर्स आणि फायनान्शिअल सर्व्हिसेस सारख्या क्षेत्रांत यंदा १०.५% पर्यंत पगारवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.