टीम इंडियाचा माजी फलंदाज विनोद कांबळी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. शनिवारी (21 डिसेंबर) रात्री उशिरा त्यांना ठाण्यातील आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या सर्व आवश्यक चाचण्या केल्या जात आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
नुकताच विनोद कांबळीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो सचिन तेंडुलकरशी बोलताना दिसला. यादरम्यान त्यांची प्रकृती ठीक नव्हती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक माजी भारतीय खेळाडू त्याच्या मदतीसाठी पुढे आले होते.
1991 मध्ये पदार्पण
विनोद कांबळीने 1991 मध्ये भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 1993 मध्ये टीम इंडियासाठी कसोटी पदार्पण केले. विनोद कांबळीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची दमदार सुरुवात केली होती. तो भारतासाठी सर्वात जलद 1000 कसोटी धावा करणारा फलंदाज ठरला. अवघ्या 14 डावात त्याने ही कामगिरी केली. यानंतर त्याची कामगिरी ढासळत गेली.
विनोद कांबळीने भारतीय संघासाठी 17 कसोटी सामन्यांमध्ये एकूण 1084 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 4 शतके आणि 3 अर्धशतके केली आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 104 सामन्यांमध्ये एकूण 2477 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने दोन शतके आणि 14 अर्धशतके केली आहेत. सततच्या खराब कामगिरीमुळे त्याला संघातून वगळण्यात आले. त्याने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना 2000 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळला होता.