मुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा माजी धडाकेबाज फलंदाज आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा बालपणाचा मित्र विनोद कांबळी (Vinod Kambli) याच्या प्रकृतीबाबत अत्यंत चिंताजनक माहिती समोर आली आहे. गेल्या काही काळापासून आजारपणाशी झुंज देणाऱ्या कांबळीची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून, त्याला गंभीर आजाराचा धोका निर्माण झाला आहे. मेंदूत रक्ताच्या गाठी तयार झाल्याची धक्कादायक माहिती त्याचे मित्र मार्कस कुटो यांनी दिली आहे.
विसरभोळेपणा वाढला, औषधांचीही आठवण राहीना
मिळालेल्या माहितीनुसार, विनोद कांबळीची स्मरणशक्ती कमकुवत होत चालली आहे. त्याला अनेक गोष्टी आठवत नसून, स्वतःची औषधे घेण्याचीही त्याला आठवण राहत नाही. या विसरभोळेपणामुळे त्यांच्यावरील उपचारांत अडचणी येत असून चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही महिन्यांपूर्वी माजी खेळाडू आणि राज्य सरकारच्या मदतीनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती, मात्र आता परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे.
‘ब्रेन स्ट्रोक’चा गंभीर धोका
कांबळीचे निकटवर्तीय मार्कस कुटो यांनी ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना सांगितले की, “विनोदच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्या आहेत. दुर्दैवाची बाब म्हणजे, विनोदने आरोग्याची पथ्ये न पाळल्यामुळे या गाठी सध्या काढता येणे शक्य नाही. यामुळे त्याला कोणत्याही क्षणी ब्रेन स्ट्रोक येण्याचा मोठा धोका आहे.” या माहितीमुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ उडाली आहे.
माजी खेळाडूंनी केला होता मदतीचा हात पुढे
कांबळीच्या आर्थिक आणि शारीरिक परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर क्रिकेट विश्वातून हळहळ व्यक्त केली जात होती. सचिन तेंडुलकरसह अनेक माजी खेळाडूंनी त्याला मदतीचा हात दिला होता. मात्र, आता पुन्हा एकदा या स्टार क्रिकेटपटूचा जीवनसंघर्ष तीव्र झाला आहे.
