मुंबई – आपल्या निर्भिड लेखणीसाठी प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांचे निधन झाले आहे. ही माहिती त्यांची मुलगी मल्लिका दुआने दिली आहे. गेल्या आठवड्यात विनोद दुआ यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दिल्लीतील एका हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.
विनोद दुआ यांनी आज वयाच्या 67 वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. विनोद दुआ यांची कन्या मल्लिका दुआने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहीले आहे की, निर्भिड असे आमचे वडील, विनोद दुआ यांचं निधन झालं असून उद्या दुपारी ( रविवारी ) लोधी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
विनोद दुआ यांनी 42 वर्षे पत्रकार म्हणून काम करताना आपल्या नि:पक्षपाती पत्रकार म्हणून नावलौकीक मिळवलं आहे. त्यांनी आजवर दूरदर्शन, एनडीटीव्ही न्यूज, द वायर’ आणि एचडब्ल्यू न्यूजसाठी काम केलं आहे. दुआ यांच्या निधनानंतर पूर्ण भारतभरातून मोठ्या प्रमाणावर त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. देश पातळीवरील अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
काही दिवसांपूर्वी दुआ यांना कोरोना झाला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र रुग्णालयात गेल्यानंतर विनोद यांची तब्येत खूपच खराब होत गेली आणि त्यातच त्यांचं निधन झालं.
दुर्देवाची गोष्ट म्हणजे विनोद दुआ यांची पत्नी पद्मावती दुआ यांनाही या वर्षी जूनमध्ये कोरोना झाला होता आणि त्याचदरम्यानच त्याचंही 11 जूनला निधन झालं होत. एकाच वर्षात आई-वडील सोडून गेल्याने दुआ यांच्या दोन्ही मुलींवर मोठा आघात झाला आहे. दुआ याची एक मुलगी सायकॉलॉजिस्ट तर दुसरी मुलगी कॉमेडिअन आहे.
विनोद दुआ यांच्या नावावर आहेत अनेक मोठे पुरस्कार
विनोद दुआ यांना 1996 मध्ये रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कार देण्यात आला होता. तर 2008 मध्ये भारत सरकारने त्यांच्या शानादार पत्रकारितेसाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानीत केले होत. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी दिलेल्या अमूल्य योगदानाचे कौतुक करण्यासाठी मुंबई प्रेस क्लबने त्यांना रेडइंक हा पुरस्कार तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान केला होता.
‘खाना-खजाना’ या कार्यक्रमातून विनोद दुआ झाले होते पूर्ण भारताला परिचीत
‘खाना-खजाना’ हा विनोद दुआ यांचा आजवरचा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम होता. या सुपरहिट कार्यक्रमाच्या माध्यमातून दुआ यांनी भारतातील वेगवेळ्या भागांमधील खाद्यपदार्थांचे प्रकार देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले होते. त्याचा हा शो आजही आवडीने पाहिला जातो.