
कोल्हापूर : कोल्हापुरमध्ये शिवसेनेचा मेळावा सुरू आहे. यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडवणीस यांच्यासह सध्याच्या राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिंदुत्वाचा मुर्दा पाडला. कपाळावर टिळा लावण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावला आहे, अशी टोकाची टीका विनायक राऊत यांनी केली आहे.
संभाजीनगरचं नाव बदलण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घोषित केला होता. ज्याला आता शिंदे सरकारने स्थगिती दिली आहे. यावरुनही राऊतांनी टीका केली आहे. विनायक राऊत म्हणाले, हे करताना जनाची ना मनाची तरी वाटायला हवी. लाचारी पत्करली पण दिघे साहेबांचे तरी स्मरण करा, असं विनायक राऊत यांनी एकनाथ शिंदेंना म्हटलं.
यावेळी बोलताना विनायक राऊत यांनी राजेश क्षीरसागर यांच्यावरही निशाणा साधला आहे. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीमध्ये बेईमानीची कीड मी स्वतः अनुभवली. घरी जेवायला बोलवून खर्च दुसऱ्याकडून करायचा ही क्षीरसागर यांची वृत्ती आहे. मला आणि नाना पटोलेंना घरी घातलेल्या जेवणाचा खर्च बंटी पटलांकडून घेतला, असा आरोपही त्यांनी केला.
राज्यातील सरकारवर बोलताना विनायक राऊत म्हणाले, देवेंद्र फडणवीस आज मुख्यमंत्र्यांचा माईक ओढतात, उद्या पॅन्ट ओढतील आणि त्यांना नागडे करून सोडतील. खोक्यांना बळी पडलेल्यांचे राजकीय आयुष्य नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.