सिंधुदुर्ग – शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना थेट आव्हान दिले आहे. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना आणि त्यांच्या मुलांचा पराभव केल्याचा उल्लेख करतानाच पुढील विधानसभा येथून लढून दाखवावी, डिपॉझिट जप्त झालं नाही तर नाव लावणार नाही, असं थेट हल्ला राऊतांनी केला आहे.
विनायक राऊत बोलताना म्हणाले की, नारायण राणेंनी हिम्मत असेल तर, वैभव नाईक यांच्यासमोर कुडाळ आणि मालवणमध्ये निवडणूक लढवावी. हिम्मत असेल तर विधानसभा निवडणुकीला उभे राहा असे म्हणत राणेंवर निशाण साधला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याने राणेंना एकदा तर त्यांचा मुलाला दोनवेळा आपटलं आहे असंही राऊत पुढे म्हणाले.
‘सिंधुदुर्गात राणेंची डाळ कधीच शिजू शकत नाही. शिवसेनेच्या अंगावर जो येईल त्याला मर्द शिवसैनिक त्याची जागा दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. अशी घणाघाती टीका राऊतांनी केली. कोकणात राणे विरूद्ध राऊत हा संघर्ष गेल्या बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी दोन्ही बाजूच्या नेत्यांची टोलवाटोलवी पाहायला मिळाली होती.