कँन्सरशी झुंज ठरली अपयशी! दिग्गज मराठी अभिनेते विजय कदम यांचं निधन

WhatsApp Group

मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय कदम यांचे शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. विजय कदम हे गेले दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 2 वाजता अंधेरी येथील स्मशानभूमीl अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. विजय कदम यांच्या निधनाने हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

विजय कदम यांनी रंगभूमी गाजवलीच शिवाय सिनेसृष्टीमध्येही दमदार भूमिका साकारल्या. ‘चष्मेबद्दूर’, ‘मंकी बात’, ‘ब्लफमास्टर’, ‘टोपी घाला रे’, ‘भेट तुझी माझी’, ‘देखणी बायको नाम्याची’ या त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रचंड गाजल्या. विजय कदम युवा रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी नव्या पिढीची नाटकं पाहायला हजेरी लावायचे. याशिवाय पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावून अनेक कलाकारांचं कौतुक करायचे. विजय कदम यांनी शेवटी झी मराठीवरील ‘ती परत आलीये’ मालिकेत बाबूराव तांडेल ही भूमिका साकारली.

विजय कदम यांनी चष्मेबहाद्दर, पोलीसलाईन, हळद रुसली कुंकू फसलं, आम्ही दोघे राजा राणी अशा चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केली. विजय कदम यांच्या निधनामुळे अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विजय कदम यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या. याशिवाय काही मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या.