Video: पूंछमध्ये नायब सुभेदारासह दोन जवान गेले वाहून

WhatsApp Group

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी भारतीय लष्कराचे दोन जवान नदीत वाहून गेले. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. यातील एका जवानाचे नाव नायब सुभेदार कुलदीप सिंग असे आहे. अन्य जवानाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

वृत्तसंस्था पीटीआयने लष्कराच्या अधिकार्‍यांच्या हवाल्याने सांगितले की, हे सैनिक पुंछच्या सुरनकोटमधील पोशाना येथील डोगरा नाला ओलांडत होते, मात्र मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे पाण्याच्या जोरदार प्रवाहाने ते वाहून गेले.

शनिवारी संध्याकाळी अधिकाऱ्यांनी सांगितले होते की लष्कर, पोलीस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे संयुक्त पथक दोघांचा शोध घेत आहेत, परंतु अद्याप काहीही सापडले नाही. लष्कर आणि पोलिसांचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्याचे निरीक्षण केले. दरम्यान, अतिवृष्टीनंतर लोकांना नदी/नाल्यांपासून दूर राहण्याचा सल्ला देत पोलिसांची वाहने जिल्ह्याच्या विविध भागात फिरत आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस

जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी थांबवावी लागली. रामबन जिल्ह्यातील 270 किमी लांबीच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी भूस्खलन झाले. बोगदा वाहून गेल्याने जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.