
चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) स्टार खेळाडू अंबाती रायडूने इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून निवृत्ती जाहीर केली आहे. २०२२ चा हा हंगाम त्याचा शेवटचा असेल. आता या मोसमात चेन्नई संघाचे फक्त दोन सामने शिल्लक आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
36 वर्षीय रायुडूने आतापर्यंत आयपीएलमध्ये एकूण 187 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 29.08 च्या सरासरीने 3290 धावा केल्या आहेत. रायुडूने आयपीएल कारकिर्दीतही शतक झळकावले आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 100 धावा आहे. रायुडूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 22 अर्धशतके ठोकली आहेत.
मूळ हैदराबादचा असलेल्या रायडूने चालू आयपीएल हंगामात आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 271 धावा केल्या आहेत. रायुडूने ट्विट करून निवृत्तीची घोषणा केली आहे. त्याने ट्विटमध्ये लिहिले की, ‘मला जाहीर करताना आनंद होत आहे की, आयपीएलमधील हा शेवटचा सीझन असेल. लीगमध्ये खेळणे माझ्यासाठी सर्वोत्तम ठरले आहे. मी 13 वर्षांपासून दोन मोठ्या संघांचा भाग आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचा भाग असणं हा एक अद्भुत प्रवास होता. त्याबद्दल त्यांचे आभार.
अंबाती रायुडूला 2019 वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नव्हते. विश्वचषकासाठी स्टँडबाय म्हणून त्याच्या नावाचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर रायुडूला राग आला आणि त्याने जुलै 2019 मध्ये क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली.
मात्र, दोन महिन्यांनंतर त्याने निवृत्ती तोडली आणि हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला ईमेल पाठवून पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली. यापूर्वी 2018 मध्ये रायडूने मर्यादित षटकांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.