सुपरस्टार महेश बाबूवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

WhatsApp Group

Veteran Actor Krishna Passed Away: साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे वडील कृष्णा घट्टमनेनी यांनी मंगळवारी (15 नोव्हेंबर) सकाळी जगाचा निरोप घेतला. मंगळवारी पहाटे 4 वाजता हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कृष्णा घट्टमनेनी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

महेश बाबूचे वडील कृष्णा हे प्रसिद्ध तेलुगू अभिनेते होते. त्यांना इंडस्ट्रीत सुपरस्टार कृष्णा म्हणूनही ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी याबाबत ट्विट करून सांगितले की, कृष्णा घट्टमनेनी यांनी वयाच्या 79 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने हैदराबादमध्ये अखेरचा श्वास घेतला.

350 हून अधिक चित्रपटांमध्ये केले आहे काम 

दिवंगत कृष्णा घट्टमनेनी यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि ते त्यांच्या काळातील सर्वोच्च अभिनेत्यांपैकी एक होते. यासोबतच ते एक अनुभवी निर्माता-दिग्दर्शकही मानले जात होते. त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकली. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना 2009 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी 1997 मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक असण्यासोबतच ते काँग्रेस पक्षाचे खासदारही होते.

हे वर्ष महेश बाबूसाठी खूपच कठीण गेले आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात त्यांचे भाऊ रमेश बाबू यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्याच वर्षी त्यांनी त्यांची आई इंदिरा देवी गमावली. इंदिरा देवी यांना वयाशी संबंधित आजार होता. त्यांच्यावर हैदराबाद येथील एआयजी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने सप्टेंबरमध्ये त्यांनी या जगाचा निरोप घेतला.