Kaikala Satyanarayan passed away: सिनेजगतातून एक वाईट बातमी समोर येत आहे. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे 23 डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या हैदराबाद येथील राहत्या घरी निधन झाले आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या अनेक समस्यांशी झुंज देत होते. सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. वृत्तानुसार, अभिनेत्याचे अंतिम संस्कार उद्या, 24 डिसेंबर रोजी महाप्रस्थानम येथे होणार आहेत.
वामशी आणि शेखर यांनी ट्विटर हँडलवरून अभिनेता कैकला सत्यनारायण यांच्या निधनाची माहिती दिली आहे. ते लिहितात, ‘ज्येष्ठ अभिनेते कैकला सत्यनारायण गरू यांचे निधन झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. कैकला सत्यनारायण यांनी आज सकाळी हैदराबादमधील फिल्म नगर येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याने 1960 मध्ये नागेश्वरम्मा यांच्याशी लग्न केले आणि ते दोन मुली आणि दोन मुलांचे पालक आहेत. सत्यनारायण यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
Legendary actor #KaikalaSatyanarayana garu Passed away 💔
May his soul rest in peace 🙏 pic.twitter.com/I8TJ5nlYgf
— 𝐕𝐚𝐦𝐬𝐢𝐒𝐡𝐞𝐤𝐚𝐫 (@UrsVamsiShekar) December 23, 2022
कैकला सत्यनारायण हे तेलुगू सिनेमातील सर्वात प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 750 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. महेश बाबू ते एनटीआर आणि यश यांच्यासोबतही त्यांनी काम केले आहे. ते एक अभिनेते तसेच चित्रपट निर्माते होते.
गेल्या वर्षीही श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने अभिनेत्याला हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांची प्रकृती चिंताजनक होती. 87 वर्षीय कैकला दीर्घकाळापासून वयोमानाशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. या अभिनेत्याच्या निधनावर दक्षिण भारतीय चित्रपटांतील बड्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.