वेदांता पॉवर प्लांटमध्ये काळाचा घाला! भीषण बॉयलर स्फोटात 9 कामगारांचा मृत्यू, 40 जण जखमी

WhatsApp Group

छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातून एक अतिशय भीषण आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वेदांता पॉवर प्लांटमध्ये झालेल्या भीषण बॉयलर स्फोटात ९ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मृतांच्या नातेवाईकांनी प्लांटबाहेर मोठा गोंधळ घातला आहे.

शक्ती जिल्ह्यातील डभरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सिंघीतराई येथील ‘वेदांता पॉवर प्लांट’मध्ये मंगळवारी नेहमीप्रमाणे कामकाज सुरू होते. दुपारी २ वाजेच्या सुमारास अचानक प्लांटमधील बॉयलरचा भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, परिसरातील ३ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, बॉयलरची ट्यूब फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. स्फोटाच्या वेळी तेथे अनेक मजूर काम करत होते, त्यामुळे जखमींचा आकडा मोठा आहे.

रुग्णालयात उपचार सुरू; १२ जणांची प्रकृती चिंताजनक

या भीषण दुर्घटनेत जवळपास ३० ते ४० कामगार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले असून ते गंभीररित्या होरपळले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने रायगड येथील जिंदाल फोर्टिस रुग्णालय आणि खरसिया येथील पद्मावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आणखी ६ कामगारांचा मृत्यू झाला, ज्यामुळे एकूण मृतांची संख्या ९ वर पोहोचली आहे. जखमींपैकी १२ जणांची प्रकृती अत्यंत गंभीर असून ते ८० टक्क्यांहून अधिक भाजले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी दिली आहे.

प्लांटबाहेर नातेवाईकांचा आक्रोश आणि प्रशासकीय धावपळ

घटनेची माहिती मिळताच कामगारांच्या नातेवाईकांनी वेदांता प्लांटच्या मुख्य प्रवेशद्वारावर गर्दी केली. आपल्या माणसांची अवस्था पाहण्यासाठी आणि त्यांना भेटण्यासाठी नातेवाईकांनी जोरदार निदर्शने केली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी अमृत विकास तोपनो आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. मदतकार्य आणि तपासासाठी अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; राजकीय प्रतिक्रिया

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी या घटनेवर खोल दुःख व्यक्त केले आहे. ही दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले आहे. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून बाधितांना योग्य मोबदला आणि जखमींना उत्कृष्ट उपचार मिळवून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.