जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत हाच शिक्षण विभागाचा प्रयत्न – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
औरंगाबाद – शैक्षणिक, भौतिक, मानसिक पातळीवर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून जागतिक पातळीवर ते यशस्वी व्हावेत, आदर्श व जबाबदार नागरिक घडावेत, यासाठी शिक्षण विभागाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्याचाच एक भाग म्हणून देशपातळीवर पहिल्यांदाच शाळा पूर्व तयारी अभियान होत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ औरंगाबादेतून होत असल्याने मनस्वी आनंद होत असल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.
सातारा परिसरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतून राज्यस्तरीय शाळा पूर्व तयारी अभियान मेळाव्याचे उद्घाटन मंत्री वर्षा गायकवाड यांच्याहस्ते झाले.
यावेळी मंचावर आमदार विक्रम काळे, आमदार प्रशांत बंब, माजी आमदार डॉ.कल्याण काळे, माध्यमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक एम.देवेंद्र सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे, विभागीय उपसंचालक अनिल साबळे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या उपसंचालक नेहा बेलसरे, विकास गरड, सहसंचालक रमाकांत काठमोरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. कलिमोद्दीन शेख, शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण, एम.के. देशमुख आदींसह विभागातील शिक्षण विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जागतिक पातळीवर विद्यार्थी यशस्वी व्हावेत हाच शिक्षण विभागाचा प्रयत्न असल्याचे शालेय शिक्षणमंत्री @VarshaEGaikwad यांचे प्रतिपादन. त्यांनी अभियानाला लोक चळवळीत रूपांतरीत करण्यासाठी ग्रामस्थ, सरपंचांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. pic.twitter.com/OMMmvNOvp2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) April 18, 2022
मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या, या वर्षीपासून शाळा पूर्व तयारी अभियान मेळावा हा आगळावेगळा उपक्रम शिक्षण विभागाकडून राबविण्यात येत आहे. या अभियानामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, भौतिक आणि मानसिक आदींसह सर्वांगीण विकासाबरोबरच विविध विषयांचा पाया भक्कम होण्यास मदत होणार आहे. लहानपणीच पाया भक्कम झाल्याने जिल्हा परिषदेतील विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत यशस्वी होईल.
या अभियानामुळे पाल्यांमध्ये जिज्ञासूवृत्ती वाढण्यास मदत होणार आहे, असा विश्वासही गायकवाड यांनी व्यक्त केला. अशा उपक्रम वा अभियानाचे रुपांतर लोकचळवळीत व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या अभियानाला लोक चळवळीत रूपांतरीत करण्यासाठी ग्रामस्थ, सरपंचांनी पुढाकार घेण्याचे आवाहनही त्यांनी केली.
मराठवाड्यातील निजामकालीन शाळांच्या दुरूस्तीसाठी 107 कोटींपैकी 92 कोटी रुपये शासनाने दिलेले आहेत. आदर्श शाळा या संकल्पनेंतर्गत राज्यातील 488 शाळांना मागीलवर्षी 54 कोटी तर यावर्षी 300 कोटी रुपये देणार असल्याचेही मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या.