10 षटकार… दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी! वैभव सूर्यवंशीचे अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक

WhatsApp Group

जोहान्सबर्ग: भारतीय क्रिकेटचा नवा उदयोन्मुख तारा आणि अंडर-१९ संघाचा कर्णधार वैभव सूर्यवंशी याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या युथ वनडे सामन्यात मैदानावर अक्षरशः धावांचा पाऊस पाडला. पहिल्या सामन्यातील अपयश धुवून काढत वैभवने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर तुफानी फलंदाजी केली आणि अवघ्या १९ चेंडूत अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम केला. त्याच्या या खेळीने दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाज हतबल झाले होते.

१० षटकार अन् २८३ चा स्ट्राईक रेट

वैभव सूर्यवंशी जेव्हा मैदानात उतरला तेव्हापासूनच त्याने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याने आपल्या ६८ धावांच्या खेळीत केवळ एक चौकार मारला, पण तब्बल १० वेळा चेंडू सीमापार धाडला. विशेष म्हणजे, अर्धशतक पूर्ण करेपर्यंत त्याने धावून केवळ दोनच धावा घेतल्या होत्या, इतर सर्व धावा त्याने चौकार-षटकारांच्या मदतीने वसूल केल्या. २८३ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्या वैभवला नवव्या षटकात मायकेल क्रुइस्काम्पने बाद केले, अन्यथा तो शतकाच्या दिशेने वेगाने कूच करत होता.

कर्णधारपदाची जबाबदारी आणि फॉर्ममध्ये पुनरागमन

आयुष म्हात्रेच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या वैभवने या खेळीतून आपल्या फॉर्मचे दर्शन घडवले आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो केवळ ११ धावा करून बाद झाला होता, मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने कर्णधाराला साजेसा खेळ केला. वैभव सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून, नुकत्याच झालेल्या ‘विजय हजारे ट्रॉफी’मध्ये त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध ८४ चेंडूत १९० धावांची ऐतिहासिक खेळी केली होती. त्याच फॉर्मची पुनरावृत्ती त्याने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर केली आहे.

दक्षिण आफ्रिकेचे २४६ धावांचे आव्हान

तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेच्या अंडर-१९ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. जेसन रोल्सच्या ११४ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर आफ्रिकेने २४५ धावांपर्यंत मजल मारली. भारताकडून किशन कुमारने शानदार गोलंदाजी करत ४ बळी घेतले, तर आर. एस. अम्बरीशने २ विकेट्स पटकावल्या. कनिष्क चौहान आणि खिलन पटेल यांनीही प्रत्येकी एक बळी मिळवून आफ्रिकन फलंदाजीला खिळ लावली. वैभवच्या या स्फोटक सुरुवातीमुळे भारतासाठी हे लक्ष्य गाठणे सोपे झाले आहे.