मुंबई – कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-19 लसीकरण आजपासून म्हणजेच बुधवारी राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त सुरू करण्यात येणार आहे. या वयोगटातील लाभार्थ्यांना फक्त हैदराबादस्थित बायोलॉजिकल-ईने विकसित केलेल्या कॉर्बेवॅक्स लसीनं लसीकरण करण्यात येणार आहे.
ऑनलाइन नोंदणीव्यतिरिक्त, लाभार्थी लसीकरण केंद्रावर जाऊन थेट लस घेऊ शकणार आहेत. देशातील या वयोगटातील 4,74,73,000 मुलांना लसीकरण कार्यक्रमामध्ये समाविष्ट केले जाणार आहे.
केंद्राने सर्व राज्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की 12 वर्षांखालील मुलांना लसीकरणामध्ये समाविष्ट करता येणार नाही. लस देण्यापूर्वी, वयाशी संबंधित कागदपत्रे तपासून बालकाला लसीकरण करण्याची जबाबदारी सदर केंद्राच्या मुख्याधिकाऱ्यांची असणार आहे. त्यांचे वय मार्च 2022 पर्यंत 12 ते 14 वर्षांच्या दरम्यान असावे.