एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठममधून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. पैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाने दरवाजा उघडताच करंट लागला. जवळ असलेल्या काही लोकांनी कपडे आणि लाकूड याच्या मदतीने तरुणाला एटीएमच्या दरवाजापासून दूर केले. त्याला तातडीने रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले पण त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लिसा़डी रोडवर इंडिया वन बँकेचे एक एटीएम आहे. कोतवाली भागामध्ये राहणारा दानिश एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी दानिशला दरवाजा उघडताच शॉक लागला. ही घटना घडताच तेथे लोकांची गर्दी झाली.
लोकांनी त्याला कसंबसं दरवाज्यापासून लांब केलं. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पण तिथे त्याचा मृत्यू झाला. दानिशच्या मृत्यूनंतर परिसरातील लोकांनी एटीएमबाहेर मोठा गोंधळ घातला.
एटीएमला विजेचा सप्लाय करण्यासाठी जी तार लावण्यात आली होती. ती दरवाजावरून लावण्यात आली होती. मात्र मध्येच ती कट झाली असल्यामुळे त्यातून करंट येत होता. यामुळेच दानिशला देखील शॉक लागला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरातील लोकांची समज काढत शांत केलं आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी याप्रकरणी एटीएम असणाऱ्या कंपनीविरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास करत आहेत.