एका बाजूला भोंगे आहेत तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत, भोंग्याच्या विषयावर वाद होता कामा नये – रामदास आठवले
मुंबई – मशिदींवरील भोंग्यांवरून भाजपा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रमझान संपल्यानंतर म्हणजेच ३ मेनंतर मशिदींवरील भोंगे उतरविले नाहीत, तर मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा वाजविण्याचा इशारा दिला आहे.
त्यानुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली असून, राज ठाकरे यांच्या भूमिकेला भाजपानेही पाठिंबा दिल्यामुळे राज्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.याबाबत आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नागपूरमध्ये बोलताना रामदास आठवलेंनी राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेबाबतही भाष्य केले आहे.
एका बाजूला भोंगे आहे तर दुसऱ्या बाजूला सोंगे आहेत. भोंग्याच्या विषयावर कोणताही वाद होता कामा नये. पिढ्यान पिढ्यांपासून मशिदींवर भोंगे असतात. ते उतरण्याची मागणी करण्यापेक्षा राज ठाकरेंना मंदिरावर भोंगे लावयचे असतील तर त्यांनी लावावेत. पण धर्माधर्माध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये, असं रामदास आठवले म्हणाले आहेत.
राज ठाकरेंनी त्यांची भूमिका बदलेली आहे. त्यांच्या झेंड्यामध्ये विविध रंग होते. पण त्यांनी आता एकदम कठोर भूमिका घेतली आहे. या कठोर भूमिकेमुळे त्यांना कोणताही राजकीय फायदा होणार नाही. बाळासाहेब असताना त्यांनी अशा प्रकारची कोणतीही मागणी केली नव्हती. त्यांनी दहशतवादी मुस्लिमांना विरोध केला होता.
जे हिंदू समाजामधून मुस्लिम झाले आहेत त्यांच्याविरोधात भूमिका घेणे योग्य नाही. भोंगे काढण्याचा प्रयत्न कोणीही करु नये. ज्यांना मंदिरांवर भोंगे लावायचे असतील त्यांना तो लावण्याचा अधिकार आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार परवानगी घेऊन भोंगे लावायला काही हरकत नाहीय,” असंही रामदास आठवले यावेळी बोलताना म्हणाले.