नारायण राणेंनी स्वत:हून ‘अधीश’ बंगल्यावर मारला हातोडा, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

WhatsApp Group

मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वत: त्यांच्या मुंबईतील अधिश बंगल्याचे बेकायदा बांधकाम गुरुवारपासून हटवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेचे बुलडोझर पोहोचण्यापूर्वीच नारायण राणे यांनी ही कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे त्यांच्या बेकायदा बांधकामांवर मुंबई महानगरपालिकेची कारवाई करण्याची प्रक्रिया तूर्तास थांबली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नारायण राणे यांनी मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या अधिश बंगल्यात कोस्टल रेग्युलेशन झोन (CRZ) कायद्याचे उल्लंघन करून बेकायदा बांधकाम केले होते. याबाबत संतोष दांडेकर नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याने संबंधित विभागाकडे तक्रार केली होती.

हे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने राणेंना नोटीस बजावली होती, त्याला राणेंनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र उच्च न्यायालयाने ही नोटीस कायम ठेवत मुंबई महापालिकेला बेकायदा बांधकाम पाडण्याचे आदेश दिले. त्यानंतर याच प्रकरणाबाबत नारायण राणे यांनी उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केल्याने न्यायालयाने संतप्त होत नारायण राणे यांना 10 लाखांचा दंड भरण्याचे आदेश दिले. बेकायदा बांधकाम वाचवण्यासाठी नारायण राणेंनी सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली, मात्र तिथूनही निराशाच झाली. यासाठी आजपासून नारायण राणे यांनी आपल्या आलिशान बंगल्यातील बेकायदा बांधकामांची तोडफोड करण्याचे काम सुरू केले आहे.