उद्धव ठाकरे यांनी हिंदूत्वाशी गद्दारी करून शरद पवारांच्या मांडीला मांडी लावली – नारायण राणे

WhatsApp Group

सिंधुदुर्ग – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिंदूत्वाशी गद्दारी केली आणि शरद पवारांच्या मांडीला मांडी लावली. काँगेस आणि राष्ट्रवादी सोबत फक्त मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे गेले आहेत, अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. सिंधुदुर्ग मधील मालवण येथे नारायण राणे बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, मराठी माणसाच्या न्याय हक्कांसाठी झगडणारी शिवसेना असे बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले म्हणून आम्ही वयाच्या 15 व्या वर्षी शिवसेनेमध्ये गेलो. बाळासाहेब असतानाची तेव्हाची भूमिका आणि आताची उद्धव ठाकरे असतानाची शिवसेनेची भूमिका खूप वेगळी आहेत. मराठी माणूस सत्तेत कुठे आहे. शिवसैनिकांना मुख्यमंत्री भेटतात का?, आमदारांना भेटतात का? मुख्यमंत्री कोणालाही भेटत नाहीत. फक्त ते काचेच्या मातोश्रीमध्ये आहेत. कॅबिनेटला ते मंत्रालयामध्ये जात नाहीत.

कालानगरच्या नाक्यांवर बोलतात तसे एकदाच विधिमंडळामध्ये मुख्यमंत्री बोलले. परवा BKC मध्ये भाषण केले, फक्त शिव्या दिल्या. हा तसा आहे, तो तसा आहे, आताच हॉस्पिटलमधून आल्यासारखा उद्धव ठाकरेंचा चेहरा वाटतो. आम्ही कोणाच्या चेहऱ्यावर, शरीरावर बोलत नाही. सुंदर चेहऱ्यावर केव्हाच बोलत नाही. दुसऱ्याच्या दिसण्यावर बोलण्यापेक्षा विकासावर बोला, प्रगतीबद्द्ल बोला, असा टोला नारायण राणे यांनी यावेळी लगावला.

नारायण राणे पुढे म्हणाले, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की मी महाराष्ट्र भर फिरणार, त्यावर मला हसायला आलं. शिवसैनिकांना भेटायला महाराष्ट्रभर फिरणार. मुख्यमंत्र्यांचे डॉक्टर माझे मित्र आहेत. त्यांना फोन करून तुमचे पेशंट चालू शकतात का? असं विचारलं तर डॉक्टर म्हणाले वीस मिनिट चालू शकतात. त्यावर चालू शकत नाहीत.

अडीच वर्षामध्ये मुख्यमंत्र्यांनी एक विकासाचं, जनहिताचं काम केलं तर सांगावं आणि मग बढाया माराव्यात. शेतकऱ्यांना 50 हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी अशी भूमिका आमचे सरकार असताना होती. यांनी एक रुपया तरी दिला का? मुंबईमध्ये 1960 साली 70 टक्के मराठी लोक राहत होती. परंतु, आता केवळ 28 टक्के मराठी लोकवस्ती आहे. अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.