महात्मा गांधीजींच्या जीवनपटावर आधारित स्मारक उभारणार – केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे

WhatsApp Group

वर्धा: वर्धा ही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी आहे. या कर्मभूमीत त्यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याचे केंद्रीय लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी आज येथे सांगितले.

महात्मा गांधी औद्योगिकरण संस्थान (एमगिरी) येथे तीन दिवसीय सेवाग्राम औद्योगिक महोत्सव प्रदर्शन, विक्री आणि कार्यशाळेचे उद्घाटन राणे यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री भानु प्रताप सिंग वर्मा, सचिव बी. स्वैन, केंद्रीय अपर सचिव शैलेश कुमार सिंह, संयुक्त सचिव विपुल गोयल, राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे सदस्य सुनिल मानसिंहका आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

भारताची अर्थव्यवस्था कृषीक्षेत्रावर आधारित असून ग्रामविकास हा त्याचा कणा आहे. याचे महत्त्व जाणून महात्मा गांधींनी ‘स्वयंपूर्ण खेडे’ ही संकल्पना राबविली. महात्मा गांधींच्या संकल्पनेतील ग्रामविकास घडविणे आवश्यक आहे. त्यासाठी सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना देण्यासाठी शासन अविरत प्रयत्नशील आहे. सेवाग्राम येथे लवकरच महात्मा गांधींच्या जीवनकार्यावर आधारित भव्य स्मारकाची निर्मिती करण्यात येईल. पर्यटक तसेच अभ्यासूंना येथे गांधींजींच्या जीवनकार्याची माहिती तर मिळेलच शिवाय येथील खादी व्यवसायाला बाजारपेठेत योग्यस्थान मिळून दिले जाईल. खादीचा खप वाढविण्यासाठी गरजेनुसार व फॅशनप्रमाणे कपड्यांची निर्मीती करण्यात येईल. मागणीप्रमाणे खादी वस्त्रांचा पुरवठा केल्यामुळे केवळ वर्धेतच नाही तर संपूर्ण देशभर येथील खादीला मागणी राहील. यातून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. पर्यटन तसेच खादी व्यवसायातून येथील अर्थव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी लघु आणि मध्यम उद्योग विभागामार्फत विशेष उपक्रम राबविण्यात येतील, असेही पुढे बोलतांना राणे म्हणाले.

सेवाग्राम स्मारकाच्या उभारणीसाठी शासनस्तरावर लवकरच समिती नेमण्यात येईल. वर्धा व सेवाग्राम परिसराचा विकास करण्यासाठी आणि येथील खादी व्यवसाय, गौशाळेवर आधारित उद्योग स्थापन करण्यासाठी नवयुवकांना प्रोत्साहित करण्यात येईल. सेवाग्राम स्मारक लवकरच नवे ‘उद्योग केंद्र’ म्हणून विकसित होईल, असा विश्वास राणे यांनी यावेळी व्यक्त केला.

INSIDE मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा