Rudi Koertzen Death: प्रसिद्ध अंपायर रुडी कोर्टझेन यांचा कार अपघातात मृत्यू

WhatsApp Group

Rudi Koertzen Death: दक्षिण आफ्रिकेचे पंच रुडी कोर्टझेन यांचा मंगळवारी कार अपघातात मृत्यू झाला आहे. ते 73 वर्षांचे होते. रुडी गोल्फ खेळण्यासाठी गेले होते आणि केपटाऊनहून नेल्सन मंडेला बे येथील आपल्या घरी परतत होते. यादरम्यान ते जात असलेल्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाला धडक बसली, ज्यात रुडीसह अन्य तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. एका स्थानिक वृत्तपत्राने ही माहिती दिली आहे. रिव्हरडेल येथे मंगळवारी सकाळी हा अपघात झाला.

रुडी हे जगातील सर्वात लोकप्रिय पंचांपैकी एक होते. ते एकूण 332 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायर राहिले आहेत. आयसीसी पंचांच्या एलिट पॅनेलमध्ये त्यांचा अनेक वर्षांपासून समावेश होता. रुडी यांच्या निधनाच्या वृत्ताने क्रिकेटप्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. रुडी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ आता त्यांच्या पुढील आंतरराष्ट्रीय सामन्यात हातावर काळ्या पट्ट्या बांधून खेळणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी सराव सामना खेळत आहे.

रुडी कोर्टझेन यांनी 9 डिसेंबर 1992 रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय सामन्यातून अंपायरिंग पदार्पण केले. या दोन्ही संघांविरुद्ध पंच म्हणून त्यांनी कसोटी पदार्पणही केले. पोर्ट एलिझाबेथच्या मैदानावरून त्याने दोन्ही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय अंपायरिंगचा प्रवास सुरू केला. त्यांनी 18 वर्षे आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केली आहे. यादरम्यान, त्यांनी 108 कसोटी, 209 एकदिवसीय, 14 टी-20 आणि एक महिला टी-20 मध्ये अंपायरिंग केली आहे.