
मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कथित बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी पोलीस तपास सुरू झाला आहे. गुरुवारी एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान, मुंबई पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले की, या संदर्भात तक्रारीवरून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती धीरज ठाकूर आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मिनेझीस यांच्या खंडपीठाने गुरुवारी सकाळच्या सत्रात निर्णय राखून ठेवला होता. दुपारच्या सत्रात हे प्रकरण पुन्हा न्यायालयासमोर घेऊन राज्य सरकारची बाजू मांडण्यात आली. यादरम्यान सरकारी वकील अरुणा कामत पै यांनी न्यायालयाला सांगितले की, ‘मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आरोपांची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे.’ पोलिसांनी तपास सुरू केल्याची माहिती दिली नसल्याचे याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितले.
मुंबईच्या गौरी भिडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्धच्या कथित बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून सविस्तर चौकशी करण्याची विनंती केली होती. यासाठी त्यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्रही लिहिले होते. ठाकरे कुटुंबीयांनी जनहित याचिका फेटाळण्याची मागणी केली होती आणि दावा केला होता की ही केवळ अनुमानांच्या आधारे दाखल करण्यात आली आहे आणि त्यात कोणतेही तथ्य नाही.
दरम्यान, बुधवारी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याच्या धमकीचे दोन फोन आले आहेत. खुद्द संजय राऊत यांनी ही माहिती दिली आहे. राऊत यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे सरकारचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर त्यांना दोनदा जीवे मारण्याच्या धमकीचे फोन आले होते. सध्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र सरकारने संजय राऊत यांच्यासह अनेक नेत्यांची सुरक्षा काढून घेतली होती. हा धमकीचा फोन कन्नड वेदिका संघटनेने दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
संजय राऊत यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने महाराष्ट्राला टार्गेट करत आहे. महाराष्ट्राची भूमी काबीज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. असे असूनही एकनाथ शिंदे आहेत. हे सरकार दिल्लीच्या इशाऱ्यावर काम करते. असं संजय राऊत म्हणाले.