राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं – नवनीत राणा

WhatsApp Group

मुंबई – भाजपाच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांनी नैतकतेची भाषा करू नये. राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांकडू शिकावं, असा हल्लाबोल भाजपाच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. त्या मुंबईत खार येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

मुख्यमंत्र्याच्या दडपशाहीची आणि आमच्यावर झालेल्या अन्यायाची तक्रार दिल्लीमध्ये करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला रवाना होत असल्याची माहिती राणा दाम्पत्याने यावेळी दिली. यावेळी नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“राज्यासमोर आज अनेक प्रश्न आहेत. ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि बेरोजगारी अशा अनेक समस्यांना राज्य तोंड देत असताना हे राज्य सरकार मात्र काहीच करत नाही. नैतिकतेची टीका आमच्यावर करणाऱ्यांनी तर बोलूच नये. भाजपाच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्यांनी नैतिकतेची भाषा करू नये. राज्य कसं चालवावं हे उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांकडून शिकावं”, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य मी ऐकलं. माझं त्यांना एवढचं म्हणणं आहे की तुम्ही उपमुख्यमंत्री असूनही मुख्यमंत्र्यांपेक्षा जास्त काम करत आहात. त्यामुळे एका महिलेवर अन्याय होत असेल तर त्याची आधी सर्व माहिती समोर आणली गेली पाहिजे. सांताक्रूझ पोलीस ठाण्यातील रात्री साडेबारानंतरचे सर्व फुटेज अजित पवार यांनी तपासून घ्यावेत. त्यानंतरच बोलावं, असं नवनीत राणा म्हणाल्या.