उद्धव ठाकरेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट, भेटीमागचं कारण आलं समोर

WhatsApp Group

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. नागपुरात सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ही भेट झाली. उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे पुत्र आणि पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण देसाई हेही उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्यांनी राजकारण तापले असतानाच ही भेट झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्याबद्दल फडणवीस यांचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते समोरासमोर बोलताना दिसले.

महायुतीच्या भव्य शपथविधी सोहळ्यासाठी ठाकरे आणि इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते, मात्र त्यांनी या सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला, हे विशेष.

बैठकीनंतर शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे म्हणाले की, देश आणि राज्याच्या हितासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी एकत्र काम करण्यासाठी राजकीय परिपक्वता दाखवली पाहिजे. ते म्हणाले, “आज आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. महाराष्ट्र सरकारसाठी काम करताना (सत्ताधारी पक्ष आणि विरोधक) दोघांनीही देश आणि राज्याच्या हितासाठी एकत्र काम केले पाहिजे.

या भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीनंतर या भेटीतून भविष्यात तयार होणाऱ्या नव्या राजकीय समीकरणांचे संकेत मानले जाणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.