काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता – उद्धव ठाकरे

WhatsApp Group

मुंबई – माझ्यासोबत जे ५० आमदार आहेत त्यांना सगळ्यांना २०२४ च्या निवडणुकीमध्ये निवडून आणणारच आणि आमच्या शिवसेना-भाजप युतीने २०० जागा जिंकल्या नाहीत तर मी राजकारण सोडेण आणि शेतावर जाईन, असा निर्धार मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये बोलताना व्यक्त केला. तसेच, आपण शिवसेनेतून बंडखोरी केली असून हा उठाव असल्याचेही त्यांनी म्हटलं. त्यावरुन, आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टिका केली आहे.

शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर झालेल्या अभिनंदनपर भाषणांना उत्तर देताना शिंदे म्हणाले की, जे घडले ते एका दिवसात घडलेले नाही. एकीकडे पक्षाकडून मला चर्चा करा म्हणत होते, दुसरीकडे मला पक्षनेतेपदावरून काढून टाकलं. मुख्यमंत्रिपदासाठी मी उठाव केला नाही. आमच्यासोबतच्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न होता. भाजपसोबत चला असं मी उद्धवजींना पाचवेळा सांगितले. पण, मला अपयश आले. स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणारा पक्ष (काँग्रेस) आमच्यासोबत होता, पण आम्ही काही बोलू शकत नव्हतो, अशी आपली अडचण त्यांनी विधानसभेत बोलताना सांगितली. त्यानंतर, आज उद्धव ठाकरेंनी महिला पदाधिकाऱ्यांसाठी मेळावा घेतला, यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर नाव न घेता टिका केली आहे.

शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, संघटक यांची शिवसेनाभवनामध्ये बैठक संपन्न झाली. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. त्यानंतर, उद्धव ठाकरें यांनीही महिला पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा. ”काल रिक्षावाल्याची रिक्षा सुस्साट सुटली होती, ब्रेकच लागत नव्हता”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना लगावला. तसेच, काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील माहिती नाही, असा खोचक टोमणाही उद्धव ठाकरे यांनी मारला.