नव्या कोरोना व्हेरिअंटची धास्ती घेत ठाकरे सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर, हे केल्यास बसणार दंड
मुंबई – दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिअंटच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्र सरकारकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर राज्य सरकारांनेही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ राज्य सरकारने बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. या रांज्यामध्ये प्रवेश करणाऱ्यासाठी आता आरटी-पीसीआर चाचणी आवश्यक करण्यात आली आहे.
तसेच दिल्ली, मध्य प्रदेश, केरळ, उत्तराखंडसह इतर अनेक राज्यांनी त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे. धारवाड मेडिकल कॉलेजमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी पॉझिटिव्ह आल्यानंतर कर्नाटक सरकारने आधीच नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.
कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्थळावरून राज्यात येणारे सर्व प्रवासी कोणत्याही परिस्थितीत भारत सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करतील, असे महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. याशिवाय, त्या देशांतर्गत प्रवाशांना राज्यात प्रवेश दिला जाईल, ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किंवा RT-PCR निगेटिव्ह अहवाल 72 तासांचा असेल अश्या प्रवाशांना राज्यात प्रवेश दिला जाईल.
ठाकरे सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर
- सार्वजनिक वाहतूक फक्त तेच वापरू शकतात ज्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
- दोन्ही डोस न घेणारी व्यक्ती टॅक्सी/ खाजगी वाहतूक, चारचाकी वाहन किंवा बसमध्ये आढळल्यास, त्या व्यक्तीला 500 रुपये दंड आकारला जाईल.
- सिनेमा हॉल, थिएटर, लग्न हॉल, दीक्षांत हॉल इत्यादी ठिकाणी 50% लोकांना परवानगी
- एकूण क्षमतेच्या केवळ 25% लोकांना खुल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची परवानगी असेल.
- ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत तेच कोणत्याही दुकानात, व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये, मॉलमध्ये, कार्यक्रमात किंवा इतर सामाजिक मेळाव्यात जाऊ शकतात.
- कार्यालयात किंवा व्यावसायिक आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या लोकांनाच कार्यालयात येण्याची परवानगी असेल ज्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्णपणे घेतले आहेत.
- 1000 पेक्षा जास्त लोकांचा जमाव कुठेही जमल्यास स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला कळवावे. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना 500 रुपये दंड आकारला जाईल.
- जर कोणत्याही संस्थेने नियमांचे पालन केले नाही तर 50000 रुपये दंड आकारला जाईल.
शनिवारी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या सर्व लोकांची कोरोना चाचणी केली जाईल, अशी घोषणा केली होती. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मुंबईत आल्यावर क्वारंटाईन केले जाईल. तसेच त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जातील. महापौर पेडणेकर पुढे म्हणाल्या की, मी प्रत्येकाला सामाजिक अंतर पाळण्याची आणि मास्क घालण्याची विनंती करते जेणेकरून हा नवीन व्हेरिअंट थांबवता येईल.