शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते उद्धव ठाकरे यांनी रविवारी बंडखोर गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह वाटप केल्याबद्दल निवडणूक आयोगाला फटकारले आणि ते सत्तेत असलेल्यांचा गुलाम असल्याचे म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून ‘शिवसेना’ हे नाव आणि त्याचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला चुना लावणारा आयोग असे म्हटले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला.
उद्धव ठाकरे म्हणाले, भारतीय जनता पक्ष (भाजप) ज्या काळात राजकीयदृष्ट्या ‘अस्पृश्य’ मानला जात होता, त्या काळात बाळसाहेब ठाकरेच त्यांच्या पाठीशी उभे होते. त्यांनी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचे नाव न घेता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावानेच मते मागावीत, असे आव्हान केले.
पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा | शिवगर्जना | खेड, रत्नागिरी – LIVE
🚩आता जिंकेपर्यंत लढायचं 🚩#UddhavThackeray #निष्ठावंतशिवसैनिक #रत्नागिरी #MAHARASHTRA
[SUNDAY-0️⃣5️⃣-0️⃣3️⃣-2️⃣0️⃣2️⃣3️⃣] https://t.co/JVEtKLRCSo
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) March 5, 2023
“तुम्ही आमच्याकडून पक्षाचे नाव आणि चिन्ह हिसकावून घेतले आहे, पण तुम्ही आमच्याकडून शिवसेना हिसकावून घेऊ शकत नाही,” असे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सभेत जमलेल्या प्रचंड जनसमुदायाकडे बोट दाखवत म्हणाले. तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. मी तुमचे आशीर्वाद आणि पाठिंबा घेण्यासाठी आलो आहे. असं ते म्हणाले.
कोकण किनारपट्टीच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदारसंघ हा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात सामील झालेले उद्धव यांचे माजी विश्वासू रामदास कदम यांचा गृह मतदारसंघ आहे. गेल्या महिन्यात निवडणूक आयोगाने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ‘शिवसेना’चे नाव आणि चिन्ह वाटप केले होते.
भाजप शिवसेनेला संपवण्याचा निर्दयीपणे प्रयत्न करत आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही, असा दावा त्यांनी केला. शिवसेनेला नेस्तनाबूत करण्याची ही खेळी म्हणजे मराठी माणूस आणि हिंदूंच्या एकतेवर हल्ला करण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.
भाजप हा पूर्वी ऋषीमुनींचा पक्ष असायचा, पण आता त्यात संधीसाधूंचा भरणा आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ‘सर्वाधिक भ्रष्ट लोक भाजपमध्ये आहेत’, असा दावाही त्यांनी केला.
भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी माझ्याकडून वडील चोरले, त्याचप्रमाणे भाजपने सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांना चोरले. महाराष्ट्रातील आगामी निवडणुकीत भाजपचा दणदणीत पराभव करण्याचे आवाहन त्यांनी आपल्या समर्थकांना केले.