
पुणे : राज्यात शिवसेनेमध्ये झालेली बंडाळी, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले शिवसेनेचे आमदार, खासदार, त्यानंतर राज्यात झालेले सत्तांतर या सगळ्यात शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे एकाकी पडल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray)हे पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. याबाबत पुण्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray)यांना विचारणा केली असता, त्यांनी साद घातली तर येऊ देत, असे सांगत नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
शिवसेनेने जर साद घातली तर याबाबत विचार करण्यात येईल, असे संकेतच त्यांनी या वक्तव्यातून दिल्याचे अर्थ काढण्यात येत आहेत. आदित्य ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्यालाही त्यांनी माध्यमांनी प्रश्न विचारलेला असताना शुभेच्छा आहेत, असे उत्तर दिले. राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले असले तरी साद घातली तर येूऊदेत, हे त्यांचे वक्तव्य महत्त्वाचे मानले जाते आहे.राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी कार्यकर्त्यांनी साद घातली तर एकत्र येऊ देत, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरे यांनी यावेळी दिली.
शर्मिला ठाकरे यांनी अशाप्रकारचं वक्तव्य करुन ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्रित करण्यास प्रयत्न केलाय, असं म्हणालया वावगं ठरणार नाही. पण त्यावर आता उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.