
मुंबई : शिवसेना आणि दसरा मेळावा यांचे अतूट नाते आहे. त्यानिमित्त दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक सहभागी होत आहेत. यावर्षी 5 ऑक्टोबरला होणाऱ्या दसऱ्याला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा होणार आहे. त्याआधीच शिवाजी पार्क मैदानावर होणारा दसरा मेळावा प्रत्यक्षात कोणी घ्यायचा यावरून रस्सीखेच सुरू झाली आहे.
सभेची परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. सध्या महापालिकेने परवानगी देण्याकडे पाठ फिरवल्याचे वृत्त समोर येत आहे. शिवसेना (Shiv Sena) नेमकी कोणाची? हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) प्रलंबित आहे. शिंदे गटाकडून वारंवार शिवसेना पक्ष, पक्षाचं चिन्ह यांवर दावा केला जात आहे. अशातच आता शिंदे गटाकडून शिवसेनेचा दसरा मेळावाही हायजॅक होणार का? या चर्चेना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.
महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात खरी शिवसेनेची लढाई सुरू आहे. शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार आपल्या बाजूने घेतल्यानंतर शिंदे यांनी शिवसेनेवर दावा ठोकला आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पक्षावर दावा करण्यासाठी दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे गोळा केली जात आहेत.
आता एकनाथ शिंदे यांच्या नजरा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे लागल्या आहेत. शिवाजी पार्क मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची दसरा सभा न चुकता आयोजित केली जाते. त्यामुळे आता उध्दव ठाकरेंच्या गटा ऐवजी जर शिंदे गटाकडून दसरा मेळावा घेण्यात आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याचं भाषण देणार का अशी उत्सुकता राज्यातील जनतेला आहे.