वर्धा – तलावामध्ये बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे दोघेही तलावाजवळ खेळत होते. समुद्रपूर तालुक्यामधील शेडगाव जवळील जुनापाणी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. मृत चिमुकले हे भाऊ-बहीण आहेत. ही घटना घडली तेव्हा या बालकांचे आई-वडील शेतामध्ये काम करत होते. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नागपुरात राहणारे पंचभाई यांचे शेडगाव येथील जुनापाणी परिसरामध्ये शेत आहे. त्यांनी मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यामधील एका कुटुंबाला शेतीच्या कामासाठी आणले होते. हे कुटुंब त्यांच्या दोन मुलांसह शेतामध्ये काम करायला गेले. त्यांची दोन्ही मुलं शेतातील परिसरात खेळत असताना अचानक दोघेही तलावामध्ये बुडाले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
ही घटना घडली त्यावेळी त्याचे आई-वडील शेतामध्ये काम करत होते. रात्री उशिरापर्यंत दोन्ही मुले घरी न दिसल्यामुले दोघांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह तलावामध्ये दिसले. घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना देण्यात आली.
पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत. हा अपघात होता की घातपात केला असावा, याबाबतही पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.