गणेश विसर्जनादरम्यान डीजेच्या दणदणाटामुळं सांगलीत दोघांचा मृत्यू

WhatsApp Group

राज्यात गणेशोत्सवाची धुम सुरु असताना सांगलीत धक्कादायक घटना घडली आहे. डीजेच्या दणदणाटामुळं दोघांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सांगलीत गणेश विसर्जनादरम्यान ही दुर्घटना घडली आहे. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

या दोन्ही तरुणांच्या मृत्येमागे डीजेचा मोठा आवाज कारणीभूत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेखर पावशे आणि प्रवीण शिरतोडे अशी दोघा मृतांची नावे आहेत. यापैकी एकाची अँजिओप्लास्टी झाली होती. डीजेच्या दणदणाटामुळं हार्टबीट वाढून हृदयविकाराचा झटका आल्याचे मृतांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.

तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे (वय 32, रा. कवठेएकंद) आणि वाळवा तालुक्यातील दुधारीमधील प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी) अशी या दोन तरुणांची नावे आहेत.कवठेएकंदमधील शेखर या तरुणाचे सोमवारी रात्री निधन झाले. मिरवणुकीतील डीजेचा तीव्र आवाज सहन न झाल्याने हृदयविकाराने त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे अवघ्या 10 दिवसांपूर्वीच त्याच्या हृदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. ऐन उत्सवाच्या वातावरणात उमद्या शेखरचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.