सिंदेवाही – खळबळ उडवून देणाऱ्या घटनेतील आणखी दोन सिलिंडर सिंदेवाही तालुक्यामधील गुंजेवाही कोटा व आसोला मेंढा तलाव येथे आढळले आहेत. तालुक्यामध्ये असे किती अवशेष विखुरले असतील, याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे.
शनिवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास तालुक्यामधील लाडबोरी येथे अवकाशातून आठ फुटाची रिंग कोसळली होती. तालुक्यामध्ये अन्यत्र संयंत्राचे भाग विखुरलेले असल्याची दाट शक्यता होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुंजेवाही परिसरामधील पवनपार व मरेगाव येथे दोन अवशेष आढळून आले होते. हे गोलाकार सिलिंडर होते.
दरम्यान, सोमवारी पुन्हा गुंजेवाही कोटा येथील बालाजी मंदिराच्या मागे तिसरा गोलाकार सिलिंडर मिळाला आहे आणि लगेच काही अंतरावर असलेल्या आसोला मेंढा तलावामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या मच्छीमारांना चौथा सिलिंडर मिळाला.
शनिवारपासून अवकाशातून पडलेले अवशेष सिंदेवाही पोलीस ठाण्यामध्ये आहेत. याचे निरीक्षण करण्यासाठी भौगोलिक शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आलं आहे अशी माहीती तहसील प्रशासनाकडून सांगण्यात आली आहे.