ट्विटरमध्ये आणखी एक मोठा बदल करण्यात आला आहे. यावेळी इलॉन मस्क यांनी ट्विटरचाच लोगो बदलला आहे. म्हणजेच आता ट्विटरवरून निळा पक्षी गायब झाला आहे. या बदलानंतर यूजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. कारण, ट्विटरने ‘डॉगी’ हा आपला नवा लोगो बनवला आहे. ट्विटरचे मालक इलॉन मस्क यांनीही यासंदर्भात एक ट्विट केले आहे, त्यानंतर असे मानले जात आहे की डॉगी हा ट्विटरचा नवीन लोगो असेल.
खरं तर, सोमवारी रात्रीपासून यूजर्सना त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर निळ्या पक्ष्याऐवजी कुत्रा दिसू लागला. हा लोगो पाहून यूजर्स आश्चर्यचकित झाले. ट्विटरच्या लोगोवर प्रत्येकाला कुत्रा दिसतोय का, असे प्रश्न त्यांनी एकमेकांना विचारण्यास सुरुवात केली. काही वेळातच, #DOGE ट्विटरवर ट्रेंड करू लागला. वापरकर्त्यांना वाटले की कोणीतरी ट्विटर हॅक केले आहे. मात्र यानंतर काही वेळातच इलॉन मस्कने एक ट्विट केले असून, ट्विटरने आपला लोगो बदलल्याचे स्पष्ट केले आहे.
— Elon Musk (@elonmusk) April 3, 2023
एलोन मस्क यांनी मंगळवारी रात्री 12.20 च्या सुमारास एक फोटो ट्विट केला. ज्यामध्ये एक कुत्रा गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला आहे आणि तो त्याचा परवाना वाहतूक पोलिसांना दाखवत आहे. या परवान्यावर निळ्या पक्ष्याचा फोटो आहे (जुना ट्विटर लोगो). त्यानंतर डॉगी ट्रॅफिक पोलिसांना सांगत आहे, “हा जुना फोटो आहे”. मस्कच्या या ट्विटनंतर ट्विटरवर केल्या जात असलेल्या विविध अटकळांना पूर्णविराम मिळाला आणि इलॉन मस्कने लोगो बदलल्याचे स्पष्ट झाले.