Jack Dorsey यांनी दिला ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा, भारतीय वंशाचे पराग अग्रवाल बनले ट्विटरचे नवे CEO
नवी दिल्ली – ट्विटरचे चे CEO जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी एक धक्कादायक निर्णय घेत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्याशी संबंधित पत्रही त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. त्यांच्या जागी भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांना ट्विटरचे सीईओ बनवण्यात आले आहे.
जॅक डॉर्सी यांनी म्हटले आहे की, मी ट्विटर सोडण्याचा निर्णय घेतला आहे, पराग अग्रवाल (Parag Agarwal) हे आता ट्विटरचे CEO असतील, पराग यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. गेल्या दहा वर्षांत त्यांनी केलेले काम अप्रतिम आहे. मी त्याच्या कौशल्याची, त्याच्या मेहनतीची आणि वचनबद्धतेची कायमच प्रशंसा करतो.
not sure anyone has heard but,
I resigned from Twitter pic.twitter.com/G5tUkSSxkl
— jack⚡️ (@jack) November 29, 2021
जॅक डोर्सी हे ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक आहेत. त्यांच्या जागी कंपनीचे मुख्य तांत्रिक अधिकारी पराग अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉर्सी पेमेंट कंपनी स्क्वेअर इंकचे प्रमुख आहेत. यापूर्वी डोर्सी यांनी 2008 मध्ये सीईओ पदाचाही राजीनामा दिला होता परंतु 2015 मध्ये ते परतले. एक वर्षापूर्वी त्यांनी सांगितले की त्यांना वर्षातील सहा महिने आफ्रिकेत घालवायचे आहेत आणि आफ्रिकेतील इंटरनेट वापरकर्त्यांबद्दल अधिक चांगले जाणून घ्यायचे आहे. मात्र, कोविड-19 मुळे ती योजना पुढे ढकलण्यात आली.
पराग अग्रवाल हे ट्विटरसाठी ऑक्टोबर 2011 ते ऑक्टोबर 2017 या कालावधीत विशेष सॉफ्टवेअर अभियंता म्हणून काम करत होते आणि ऑक्टोबर 2017 च्या दुसऱ्या कार्यकाळात कंपनीत CTO झाले. अग्रवाल हे जून 2010 ते सप्टेंबर 2010 पर्यंत केवळ चार महिने AT&T लॅबमध्ये होते. याआधी त्यांनी मायक्रोसॉफ्ट आणि याहूमध्येही काम केले आहे.
पराग अग्रवाल यांनी IIT बॉम्बे मधून संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयावर बीटेक केले आहे. तसेच त्यांनी 2005 ते 2012 दरम्यान स्टॅनफोर्ड विद्यापीठातून संगणक विज्ञानात पीएचडी केली आहे.