बारावीत कमी गुण मिळाल्यामुळे विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल; गळफास घेत संपविले जीवन

WhatsApp Group

यवतमाळ – वणी शहरालगतच्या लालगुडा येथील एका बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनीने कमी गुण मिळाल्यामुळे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सेजल अनिल सालुरकर (१७) असं आत्महत्या करणाऱ्या विद्यर्थिनीचे नाव आहे. ही घटना आज, गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.

सेजलचे वडील मिस्त्री काम करतात तर आई रोजमजुरी करते. ती वणीतील लोकमान्य टिळक महाविद्यालयातील वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी होती. सेजलला दहावीमध्ये ९० टक्के गुण मिळाले होते. मात्र, बारावीत केवळ ६५ टक्के गुण मिळाल्यामुळे ती निराश होती. या नैराश्यातूनच तिने आत्महत्या केल्याचं सांगितलं जातं आहे. या घटनेमुळे तिच्या आईला जबर मानसिक धक्का बसला असून त्यांच्यावर वणीतील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

सालुरकर यांना दोन मुली आहेत. सेजलची मोठी बहीण यवतमाळ येथे शिक्षण घेत आहे. दरम्यान, परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे किंवा अनुत्तीर्ण झाल्यामुळे कोणीही सेजलसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, अशी विनंती अनिल सालुरकर यांनी केली आहे.