Viral Video: करोडोंच्या Porsche कारवर ओतलं सिमेंट! बेंगळुरूच्या रस्त्यावरील ‘त्या’ अजब कृत्यामागचं सत्य वाचून बसेल धक्का

WhatsApp Group

आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूच्या रस्त्यांवर ट्रॅफिक असणं ही सामान्य बाब आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर या रस्त्यांवरील एका अशा व्हिडिओने धुमाकूळ घातला आहे, जो पाहून कोणत्याही कार प्रेमीच्या काळजाचा ठोका चुकेल. ज्या कारची किंमत दोन-तीन आलिशान फ्लॅटच्या बरोबरीची आहे, अशा करोडोंच्या ‘पोर्शे’ (Porsche) कारच्या बोनेटवर कोणी सिमेंट आणि खडी कालवू शकतं, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. पण हा प्रकार प्रत्यक्षात घडला असून त्यामागचं सत्य आता समोर आलं आहे.

रस्त्यावरील ‘हाय-व्होल्टेज’ तमाशा

व्हायरल व्हिडिओमध्ये एक तरुण आपली लाल रंगाची चमचमाती पोर्शे कार रस्त्याच्या मध्यभागी थांबवतो. खरी खळबळ तेव्हा उडाली, जेव्हा त्याने चक्क कारच्या बोनेटलाच सिमेंट मिक्स करण्याचं ‘तसलं’ बनवलं. त्याने बोनेटवर सिमेंट टाकलं, पाणी ओतलं आणि मोठ्या आरामात मसाला तयार करून जवळचा एक खड्डा भरला. हे पाहून नेटकऱ्यांनी त्या तरुणावर टीकेचा वर्षाव सुरू केला. महागड्या कारचा असा अपमान पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला, तर काहींना वाटलं की ही सरकारला आरसा दाखवण्यासाठी केलेली समाजसेवा आहे.

 

समाजसेवा की मार्केटिंग स्टंट?

जेव्हा या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पडला, तेव्हा एक मोठा ट्विस्ट समोर आला. सिमेंटचा मसाला साफ केल्यानंतर त्या तरुणाने बोनेटवरून एक पारदर्शक प्लास्टिकसारखा थर (Paint Protection Film – PPF) अलगद बाजूला केला. आश्चर्य म्हणजे, त्या थराखाली कारचा लाल रंग इतका फ्रेश निघाला, जणू कार नुकतीच शोरूममधून बाहेर आली आहे. म्हणजेच, ज्याला लोक समाजसेवा समजत होते, तो प्रत्यक्षात PPF ची ताकद दाखवण्यासाठी केलेला एक ‘मार्केटिंग स्टंट’ होता. आपल्या दुकानाची प्रसिद्धी करण्यासाठी आणि उत्पादनाची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तरुणाने ही शक्कल लढवली होती.

नेटकऱ्यांमध्ये दोन गट

या व्हिडिओने सोशल मीडिया युजर्सना दोन गटात विभागले आहे. एका युजरने लिहिले, “लक्ष वेधून घेण्याची ही एक उत्तम पद्धत आहे.” तर दुसऱ्याने टीका करत म्हटले की, “ही फक्त दुकान चमकवण्याची पद्धत आहे, सिमेंटने भरलेला खड्डा दोन दिवसही टिकणार नाही.” काही युजर्सनी याला सरकारला रस्ते दुरुस्तीबाबत आरसा दाखवण्याचा प्रयत्न मानला आहे, तर कार प्रेमींनी अशा प्रकारे आलिशान कारचा वापर करणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.