आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारीत ‘ट्रायबल इंडस्ट्रियल पार्क’-उद्योगमंत्री उदय सामंत
नागपूर: विदर्भाला भरभरून नैसर्गिक साधन संपत्ती लाभली आहे. उद्योगासाठी येथे पोषक वातावरण आहे. स्थानिक आदिवासी उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘ट्रायबल इंडस्ट्रीयल पार्क’ येत्या फेब्रुवारी महिन्यात कार्यान्वित करीत आहोत. उद्योगपूरक वातावरणाला चालना देत राज्यशासन उद्योजकांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे, अशी ग्वाही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विदर्भ विकास परिषदेत दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चर व महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘विदर्भ विकास परिषदे’चे उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते झाले. माजी खासदार अजय संचेती, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, उपाध्यक्ष उमेश दशरथी, विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष निकेश गुप्ता आदी यावेळी उपस्थित होते.
उदय सामंत म्हणाले की, राज्य शासनाने उद्योग विभागाच्या विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. कोविड महामारीच्या काळात राज्यातील उद्योजकांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी आतापर्यंत दोन टप्प्यात २४ कोटी रुपयांची प्रोत्साहन अनुदान राशी प्रदान केली आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत उर्वरीत प्रोत्साहन राशी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. उद्योजकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या सोडविण्यासाठी राज्य शासन आग्रही असून त्यासाठी मंत्रिमंडळ उद्योग उपसमितीची महिन्याला दोन वेळा बैठक घेण्यात येते, असे त्यांनी सांगितले.
