
आंतरराष्ट्रीय स्थरावर मानाचा मानला जाणाऱ्या कान्स चित्रपट महोत्सवाची सध्या सगळीकडेच चर्चा रंगत आहे. १७ मेपासून सुरु झालेल्या या महोत्सवाचा २८मेला शेवटचा दिवस असणार आहे. कान्सच्या रेडकार्पेटवरील नट-नट्यांचे विविध लूक आपण पाहत आहोत. यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सतत सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. पण या महोत्सवामध्ये एक विचित्र घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
कान्स चित्रपट महोत्सवामध्ये चित्रपटाचे स्क्रिनिंग सुरु असताना एक महिला अचानक कान्सच्या रेड कार्पेटवर घुसली. इतकंच नव्हे तर यावेळी तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. हद्द म्हणजे ही महिला विवस्त्र होत रेड कार्पेटवरच घोषणाबाजी करू लागली.ती गुडघ्यावर बसून आरडाओरड करत होती. या महिलेने तिचे शरीर युक्रेनच्या झेंड्याच्या रंगाने रंगवलं होतं. तिच्या शरीराच्या मध्यभागावर “स्टॉप रेपिंग अस” (“Stop Rapping Us”) असं लिहिण्यात आलं होतं. तसंच पाठीवर SCAM हा शब्द लिहिण्यात आला होता. तसेच तिच्या शरीरावर हाताचे लाल रंगाचे ठसे देखील होते.
View this post on Instagram
अनोळख्या महिलेचा हा प्रकार पाहून उपस्थितही काही वेळासाठी बुचकाळ्यात पडले. युक्रेनमध्ये महिलांवर होत असलेल्या लैंगिक अत्याचारांविरोधात ही महिला आवाज उठवण्याचा प्रयत्न करत होती. रशियन आणि युक्रेन या दोन देशांमध्ये निर्माण झालेली युद्ध परिस्थिती आजही सुरुच आहे. रशियन सैनिक युक्रेनियन महिलांवर अत्याचार करत असल्याचा दावा देखील करण्यात येत आहे.