IND vs AFG : आशिया कपमध्ये टीम इंडियाचा आज शेवटचा सामना, अफगाणिस्तानसोबत भिडणार

WhatsApp Group

Asia Cup 2022: UAE मध्ये सुरु असलेल्या आशिया कप 2022 मध्ये आज भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) आमनेसामने येतील. दोन्ही संघ आशिया चषक अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत हा सामना त्यांच्यासाठी स्पर्धेतील शेवटचा सामना असेल. दोन्ही संघांना येथे विजयासह आपला प्रवास संपवायचा आहे.

भारत आणि अफगाणिस्तानला सुपर-4 फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला आहे. या फेरीतील चारही सामने अतिशय रंजक झाले. विशेषत: बुधवारी झालेला अफगाणिस्तान-पाकिस्तान सामना खूपच रंजक झाला. याच सामन्यात पाकिस्तानच्या विजयानंतर अफगाणिस्तान आणि भारतीय संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले. आता दोन्ही संघ आपली लाज वाचवण्यासाठी मैदानात उतरतील.

अफगाणिस्तान आणि भारत यांच्यात आतापर्यंत तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने झाले आहेत. हे तिन्ही सामने भारताने जिंकले आहेत. सध्या टीम इंडियाही चांगल्या फॉर्ममध्ये आहे, मात्र गेल्या दोन सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यात टीम इंडिया आपल्या भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती न करण्याचा प्रयत्न करेल, विशेष म्हणजे दोन सामने हरल्यानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग-11 आणि खेळाच्या नियोजनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दुसरीकडे अफगाणिस्तानही मोठ्या लयीत आहे. बुधवारी रात्री झालेल्या सामन्यात केवळ 129 धावा करूनही तो पाकिस्तानवर विजय नोंदवण्याच्या जवळ पोहोचला होता. अफगाणिस्तानकडे रशीद खान, मुजीब उर रहमान, फजल हक असे भक्कम गोलंदाज आहेत. तर या संघात हजरतुल्ला झाझई आणि रहमानउल्ला गुरबाजसारखे मजबूत टी-20 फलंदाज आहेत.