हर घर तिरंगा अभियान साजरे करण्यासाठी भारतीय टपाल खाते 1.6 लाख टपाल कार्यालयांच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची विक्री करणार

0
WhatsApp Group

देशवासियांच्या हृदयात राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्यासाठी  आणि भारताच्या वाटचालीबाबत अभिमान जागृत करण्यासाठी केंद्र सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या (एकेएएम) अंतर्गत हर घर तिरंगा अभियान सुरु केले. वर्ष 2022 मध्ये देशातील 23 कोटी घरांतील नागरिकांनी घरावर प्रत्यक्ष स्वरुपात तिरंगा फडकवला तर सहा कोटी लोकांनी एचजीटी संकेतस्थळावर त्यांचे सेल्फी फोटो अपलोड करुन हे अभियान मोठ्या प्रमाणात यशस्वी केले. टपाल विभागाने (डीओपी) हे अभियान देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले आणि देशाच्या अत्यंत दुर्गम कोपऱ्यात देखील राष्ट्रध्वज उपलब्ध होईल याची सुनिश्चिती केली.

हा जोम आणि देशभक्तीची भावना यांचा अशाच प्रकारे अविष्कार करण्यासाठी, भारत सरकार यावर्षी देखील 13-15 ऑगस्ट 2023 या काळात हर घर तिरंगा अभियानाचे आयोजन करत आहे. या अभियानाला पाठबळ देण्यासाठी देशातील 1.6 लाख टपाल कार्यालयांच्या जाळ्याचा उपयोग करुन घेण्याचा आणि या अभियानाअंतर्गत देशातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज उपलब्ध होतील याची खात्री करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टपाल कार्यालयांमध्ये लवकरच राष्ट्रध्वजांची विक्री सुरु होईल आणि नागरिकांना त्यांच्या जवळच्या टपाल कार्यालयात जाऊन ध्वज खरेदी करता येतील. नागरिकांना टपाल खात्याच्या  www.epostoffice.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन त्यावरील ई-टपाल सुविधेच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाची खरेदी करता येईल.

राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या या कार्यक्रमाशी देशातील नागरिक जोडले जावेत या उद्देशाने टपाल कार्यालये विविध जागरुकता उपक्रम (लोकसहभागविषयक कार्यक्रम) देखील आयोजित करणार आहेत. नागरिकांना या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन नव्या भारताच्या या महान कार्यक्रमाचा भाग होता येईल.

नागरिक त्यांच्या घरावर तसेच कार्यालयांवर फडकवलेल्या राष्ट्रध्वजासह सेल्फी फोटो काढून #IndiaPost4Tiranga, #HarGharTiranga, #HarDilTiranga या हॅशटॅगसह समाजमाध्यमांवर अपलोड करू शकतील.