6,4,4,6,6,6,0…तिलक वर्माच्या बॅटचा धमाका! 45 चेंडूत ठोकलं वादळी शतक; 19 वर्षांनंतर जयसूर्याचा ‘तो’ महाविक्रम मोडीत

WhatsApp Group

अहमदाबाद: आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये मुंबई इंडियन्सचा (MI) युवा फलंदाज टिळक वर्माने आपल्या फलंदाजीने नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध खेळताना टिळक वर्माने मैदानात धावांचा पाऊस पाडला. अवघ्या ४५ चेंडूंमध्ये शतक झळकावत त्याने मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या पंक्तीत अव्वल स्थान गाठले आहे.

४४ धावांत ३ गडी बाद, त्यानंतर टिळकचे ‘वादळ’

या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. पॉवरप्लेमध्येच अवघ्या ४४ धावांत मुंबईने ३ महत्त्वाचे फलंदाज गमावले होते. अशा बिकट परिस्थितीत टिळक वर्माने मैदानावर ताबा मिळवला. त्याने सुरुवातीला डावाला सावरले आणि नंतर गुजरातच्या गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी केली. टिळकने आपल्या नाबाद १०१ धावांच्या खेळीत ८ चौकार आणि ७ उत्तुंग षटकार खेचले.

जयसूर्याचा १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत

टिळक वर्माने ४५ चेंडूत शतक पूर्ण करत श्रीलंकेचा दिग्गज फलंदाज सनथ जयसूर्या याच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. जयसूर्याने आयपीएलच्या पहिल्याच हंगामात (२००८) मुंबईकडून खेळताना ४५ चेंडूत शतक झळकावले होते. तब्बल १९ वर्षांनंतर मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही फलंदाजाला या विक्रमापर्यंत पोहोचता आले नव्हते, जे आज टिळक वर्माने करून दाखवले.

अशोक शर्माच्या ओव्हरमध्ये २६ धावांचा पाऊस

टिळक वर्माच्या या वादळी खेळीचा खरा ट्रेलर १८ व्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाला. गुजरातचा गोलंदाज अशोक शर्माच्या ओव्हरमध्ये टिळकने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून स्वागत केले. त्यानंतर पुढच्या दोन चेंडूंवर बॅक टू बॅक चौकार आणि चौथ्या व पाचव्या चेंडूवर पुन्हा दोन उत्तुंग षटकार खेचले. शेवटचा चेंडू डॉट गेला असला, तरी या एकाच ओव्हरमध्ये टिळकने २६ धावा लुटल्या. शेवटच्या ४ ओव्हर्समध्ये त्याने केवळ १८ चेंडूंचा सामना करत ६५ धावा चोपून काढल्या.

मुंबईच्या धावसंख्येचा डोंगर

टिळक वर्माच्या या शतकी धमाक्यामुळे मुंबई इंडियन्सने २० ओव्हरमध्ये ५ बाद १९९ धावांचा डोंगर उभारला. जरी तो सूर्यकुमार यादवचा १०३ धावांचा विक्रम मोडू शकला नसला, तरी मुंबईसाठी आयपीएल इतिहासातील हे दुसरे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या ठरली आहे.