
मुंबई : भाजप आमदार गणेश नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. शिंदे गटातील तीन नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. शिंदे गटामध्ये आमदार आणि खासदारांचे इन्कमिंग सुरुच आहे. असे असताना शिंदे गटातील नगरसेवकांना भाजपात आणण्यात गणेश नाईक यशस्वी झाले आहेत. सध्या शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात सुरु असलेला गोंधळही यासाठी कारणीभूत असल्याचे बोललं जात आहे.
नवी मुंबईतील दिघा येथील नवीन गवते, अपर्णा गवते, दीपा गवते यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आमदार गणेश नाईक यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करुन शिवसेनेला मोठा हादरा दिला आहे. शिवसेना फुटली आहे.
एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा वेगळा गट फोडल्यानंतर आता खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर आहे. गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये भाजप नगरसेवकांनी प्रवेश केला होता. जवळपास भाजपचे 14 नगरसेवक आणि नगरसेविका पक्षाला रामराम ठोकून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले होते.