सोशल मीडियावर मिळणारे काही लाईक्स आणि व्ह्यूज आपल्या जीवनापेक्षा मौल्यवान आहेत का? मध्य प्रदेशातील मऊगंज येथून समोर आलेला एक व्हिडिओ आज हाच गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे. प्रसिद्धीच्या नादात आणि सोशल मीडियावर ‘हिरो’ बनण्याच्या वेडापायी एकाच कुटुंबातील तीन तरुण मुलांचा अंत झाला आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असून तो पाहून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल.
स्टंटबाजीचा भयानक शेवट
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसते की, एका दुचाकीवर तीन तरुण बसले आहेत. मागे बसलेला तरुण हवेत पिस्तूल (कट्टा) उंचावून रुबाब दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. दुचाकी चालवणाऱ्या तरुणाने आपला चेहरा झाकला होता आणि तो हायवेवर अतिशय वेगाने, नागमोडी वळणे घेत गाड्यांना ओव्हरटेक करत होता. या सर्व स्टंटबाजीचे चित्रीकरण त्यांच्या मागे दुसऱ्या दुचाकीवर येणारे मित्र करत होते. आपल्या मित्रांच्या आयुष्यातील हे शेवटचे क्षण आपण कॅमेऱ्यात टिपत आहोत, याची पुसटशी कल्पनाही त्या मित्रांना नव्हती.
📍Mauganj, Madhya Pradesh: Three youths riding a motorcycle without helmets, one holding a country-made pistol while their friends filmed from another bike, rammed into a stationary truck on NH-135. All three lost their life on the spot. pic.twitter.com/ddNjMlgcG4
— Deadly Kalesh (@Deadlykalesh) April 19, 2026
क्षणात होत्याचं नव्हतं झालं
व्हिडिओमध्ये पुढे दिसते की, दुचाकीचा वेग प्रचंड असल्याने अचानक चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी थेट रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकवर जाऊन आदळली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. ज्या रीलच्या माध्यमातून त्यांना प्रसिद्ध व्हायचे होते, तीच रील त्यांच्या मृत्यूची साक्ष ठरली. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून एकाच वेळी तीन तरुण मुले गमावल्याने कुटुंबावर डोंगर कोसळला आहे.
तरुणाईसाठी धोक्याची घंटा
ही घटना त्या सर्व तरुणांसाठी एक धडा आहे जे सोशल मीडियावर ‘फेमस’ होण्यासाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालतात. हायवे ही रील बनवण्याची जागा नसून वाहतुकीचा रस्ता आहे, याचे भान तरुणांनी ठेवणे गरजेचे आहे. तुमची एक छोटीशी चूक आणि काही सेकंदांची स्टंटबाजी तुमच्या कुटुंबाला आयुष्यभराचे दुःख देऊ शकते. पोलीस प्रशासनाकडूनही वारंवार आवाहन करण्यात येते की, रस्त्यावर स्टंट करू नका, परंतु अशा घटनांकडे पाहून तरुण पिढी अजूनही या गंभीर धोक्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसते.
