श्री राम मंदिर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, ई-मेलमध्ये लिहिलं…

0
WhatsApp Group

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अयोध्या दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी श्री राम मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. यासोबतच यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ आणि यूपी एसटीएफ प्रमुख अमिताभ यश यांनाही ठार मारण्यात येणार असल्याचे मेलमध्ये म्हटलं आहे. धमकी देणारा स्वत:ला आयएसआयशी संबंधित असल्याचा दावा करत आहे. ही धमकी भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना ई-मेलद्वारे दिली आहे. या प्रकरणी लखनऊमधील सुशांत गोल्फ सिटी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

माहितीनुसार, भारतीय किसान मंच आणि राष्ट्रीय गाय परिषदेशी संबंधित देवेंद्र तिवारी यांना 27 डिसेंबर रोजी दुपारी 2:07 वाजता एक ई-मेल आला. आक्षेपार्ह शब्द वापरून आरोपीने अयोध्येतील श्री राम मंदिर, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एसटीएफ प्रमुख अमिताभ यश यांना उडवून देण्याची धमकी दिली आहे. ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीचे नाव झुबेर हुसेन (खान) असल्याचे सांगण्यात येत आहे. आयएसआय या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे त्याचे म्हणणे आहे.

देवेंद्र तिवारी यांनी म्हटले आहे की, आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर आपल्या सुरक्षेबाबत काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे गौसेवेच्या नावावर आपण शहीद होऊ शकतो. दरम्यान या प्रकरणाचा तपास लखनऊ एटीएसकडून सुरु करण्यात आला आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असताना हा धमकीचा मेल आला आहे. यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.