
मुंबईतील हाजी अली दर्ग्यावर हल्ला करण्याची धमकी देणारा फोन पोलिस नियंत्रण कक्षाला आला आहे. यानंतर हाजी अली दर्ग्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस कसून तपास करत आहेत.
शुक्रवारी एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून मुंबईतील हाजी अली दर्ग्यावर दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली. अज्ञात व्यक्तीने सांगितले की, 17 दहशतवादी हाजी अली दर्ग्यावर हल्ला करणार आहेत. ज्या क्रमांकावरून फोन आलेला त्या क्रमांकावर मुंबई पोलिस नियंत्रण कक्षातून फोन केला असता, तो फोन बंद होता. कॉल ट्रेस केल्यानंतर हा कॉल उल्हासनगर येथून केल्याचे निष्पन्न झाले.
फोन कॉलची माहिती मिळताच ताडदेव पोलीस ठाण्याचे पथक हाजी अली दर्गा येथे पोहोचले आणि त्यांनी तेथे कसून चौकशी केली, मात्र कुठेही काहीही संशयास्पद आढळून आले नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.