
भारतीय संघाला सेमीफायनल गाठायचे असल्यास उरलेले दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, अन्यथा टीम इंडियाचा प्रवास इथेच संपुष्टात येईल. T20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना शुक्रवारी स्कॉटलंडशी होत आहे. भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे, पण परिस्थिती अशी आहे की स्कॉटलंडला मोठ्या फरकाने हरवणे खूप महत्त्वाचे आहे. टीम इंडियाला उपांत्य फेरीच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर शुक्रवारच्या सामन्यात स्कॉटलंडला मोठ्या फरकाने पराभूत करावे लागेल.
भारतीय संघ गट-2 चा भाग आहे, सध्या या गटातून फक्त पाकिस्तानने आपले तिकीट निश्चित केले आहे. उपांत्य फेरी गाठणारा पाकिस्तान हा पहिला संघ ठरला आहे. मात्र दुसऱ्या स्थानासाठी भरण्यासाठी भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात लढत सुरू आहे. यातील सर्वात सोपा मार्ग न्यूझीलंडसाठी असू शकतो.
भारताला सेमीफायनलच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर स्कॉटलंड आणि नामिबियाला मोठ्या फरकाने पराभूत करणे गरजेजचे आहे. असे केल्याने भारताचा नेट-रन रेट चांगला होऊ शकतो. जर भारताने दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 6 गुण होतील. जर न्यूझीलंड, अफगाणिस्तानचेही शेवटपर्यंत 6 गुण असतील तर भारतासाठी नेट-रनरेट खूप फायदेशीर ठरू शकतो.
मात्र, येथे अडचण अशी आहे की, न्यूझीलंड संघाचे अजून दोन सामने बाकी आहेत. जर न्यूझीलंडने दोन्ही सामने जिंकले तर न्यूझीलंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल आणि टीम इंडियाचे प्रवास तिथेच संपेल. पण न्यूझीलंडने दोन सामन्यांपैकी एक जरी सामना गमावला तर टीम इंडियाच्या आशा वाढतील.
ऑस्ट्रेलियासारखा चमत्कार करावा लागेल
भारताला आपला नेट-रनरेट सुधारायचा असेल, तर ऑस्ट्रेलियाने बांगलादेशासमोर जे केले होते, तसेच काहीसे करावे लागेल. 4 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा डाव 73 धावांत गुंडाळला आणि अवघ्या सातव्या षटकात हे लक्ष्य गाठले. याचा ऑस्ट्रेलियाला नेट-रन रेटमध्ये मोठा फायदा झाला आणि तो संघ दक्षिण आफ्रिकेला मागे ठेवत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे.
गट-2 चा नेट-रनरेट
अफगाणिस्तान, न्यूझीलंड आणि भारताच्या नेट-रन रेटबद्दल बोलल्यास अफगाणिस्तान आघाडीवर आहे. त्यांचा नेट-रन रेट +1.481 आहे, तर न्यूझीलंडचा +0.816 आणि भारताचा +0.073 आहे. जर टीम इंडियाला आपल्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील जेणेकरून नेट-रन रेट अफगाणिस्तानच्या पुढे जाईल. अशा स्थितीत तिन्ही संघांचे 6 गुण झाले तर भारत उपांत्य फेरी गाठू शकतो.