‘या’ स्टार खेळाडूने घेतली क्रिकेटमधून निवृत्ती, आयपीएलमध्ये जिंकली होती पहिली ऑरेंज कॅप

WhatsApp Group

Shaun Marsh Retirement: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शॉन मार्शने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बिग बॅश लीगमध्ये त्याने सिडनी थंडरविरुद्ध कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. मार्शने आपल्या कारकिर्दीत अनेक मोठे विक्रम केले आहेत. तो इंडियन प्रीमियर लीगमध्येही खेळला आहे. मार्श हा आयपीएलच्या पहिल्या सत्रात ऑरेंज कॅप जिंकणारा खेळाडू आहे. त्याने आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

मार्श बिग बॅश लीगमध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळत आहे. मेलबर्न स्टार्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात त्याने चमकदार कामगिरी केली होती. मार्शने 49 चेंडूंचा सामना करत 64 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 10 चौकार मारले आणि तो नाबाद राहिला. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर मेलबर्न रेनेगेड्स संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. मार्शने आता खुलासा केला आहे की तो 17 जानेवारी रोजी सिडनी थंडरविरुद्ध त्याच्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. यानंतर तो निवृत्त होईल.

आयपीएलमधील रेकॉर्ड 

मार्शची आयपीएल कारकीर्दही उत्कृष्ट राहिली आहे. आयपीएलमध्ये तो फक्त पंजाब किंग्जकडून खेळला. त्याने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण सामना खेळला आणि पदार्पणाच्या मोसमातच ऑरेंज कॅप जिंकली. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरला. मार्शने आयपीएलचे 71 सामने खेळले आहेत. या कालावधीत 2477 धावा झाल्या. त्याने एक शतक आणि 20 अर्धशतके झळकावली. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 115 धावा आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अप्रतिम कामगिरी 

मार्शच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर नजर टाकली तर तोही प्रभावी ठरला आहे. त्याने 73 एकदिवसीय सामन्यांमध्ये 2773 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 7 शतके आणि 15 अर्धशतके केली आहेत. त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या ही 151 धावा आहे. त्याने 38 कसोटी सामनेही खेळले. या कालावधीत 2265 धावा केल्या. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या 182 धावा आहे. या काळात त्याने 6 शतके आणि 10 अर्धशतके झळकावली. मार्शने पदार्पणाच्या वनडे सामन्यात चमकदार कामगिरी केली होती. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध 7 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ८१ धावा केल्या.