भारतीय क्रिकेट संघातील ‘या’ खेळाडूने जाहीर केली तडकाफडकी निवृत्ती

WhatsApp Group

भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. दरम्यान, टीम इंडियाच्या एका खेळाडूने निवृत्तीची घोषणा केली आहे. या खेळाडूची आंतरराष्ट्रीय कारकीर्द काही खास नव्हती आणि केवळ दोन कसोटी सामने खेळल्यानंतर या खेळाडूला पुढे संधी मिळू शकली नाही. मात्र, या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीने चमकदार कामगिरी केली होती. हा खेळाडू दुसरा कोणी नसून झारखंडचा स्टार शाहबाज नदीम आहे. शाहबाज नदीमने अचानक प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. बऱ्याच दिवसांपासून त्याला भारतीय संघात पुनरागमनाची आशा होती, मात्र संधी न मिळाल्याने त्याने अखेर हा निर्णय घेतला.

शाहबाज नदीम आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अनसोल्ड राहिला. कोणत्याही संघाने त्याला आपल्या संघात घेण्यास स्वारस्य दाखवले नव्हते. इतर लीगमध्ये सहभागी होत राहणार असल्याचे त्याने स्पष्टपणे सांगितले. म्हणजेच तो परदेशी टी-20 लीगमध्ये खेळण्यावर भर देत आहे. दुसरीकडे, रणजी ट्रॉफीमध्ये त्याने शेवटचा सामना राजस्थानविरुद्ध खेळला. यानंतर तो आता देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळताना दिसणार नाही.

शाहबाज नदीमची कारकीर्द 
जर आपण शाहबाज नदीमच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली तर त्याने 2019 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून कसोटी पदार्पण केले. या सामन्यानंतर त्याला 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. या दोन सामन्यांनंतर त्याला एकदाही भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारशी कामगिरी केली नाही आणि दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याला फक्त 8 विकेट घेता आल्या. पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची आकडेवारी उत्कृष्ट आहे. त्याने 140 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 542 विकेट्स आणि 134 लिस्ट ए सामन्यांमध्ये 175 बळी घेतले. आयपीएलमध्ये तो दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला. जिथे त्याने 72 सामन्यात 48 विकेट घेतल्या.