डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 100 प्रेरणादायी सुविचार प्रत्येकाने वाचायलाच हवे…

WhatsApp Group

भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे खाली दिलेले 100 प्रेरणादायी सुविचार प्रत्येकाने वाचायलाच हवेत कारण हे फक्त सुविचार नसून जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारे अनमोल विचार आहेत.

  • आपण राजकीय चळवळीला जितके महत्त्व देतो तितकेच महत्त्व शिक्षणप्रसाराला दिले पाहिजे.
  • यशस्वी क्रांतीसाठी केवळ असंतोषच पुरेसा असतो असे नाही तर त्यासाठी न्याय, राजकीय आणि सामाजिक हक्कांवर दृढ विश्वास ठेवणे सुद्धा खूप महत्त्वाचे असते.
  • राजकीय अन्याय हा सामाजिक अन्यायाच्या तुलनेत काहीच नसतो, आणि समाजाची अवज्ञा करणारा सुधारक हा सरकारची अवज्ञा करणाऱ्या राजकारण्यापेक्षा अधिक धैर्यवान असतो.
  • तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाविना देशाच्या विकासाची कोणतीही योजना पूर्णत्वाला जाणार नाही.
  • लोकांमधील जात, वंश किंवा रंग यांच्यातील फरक विसरून सामाजिक बंधृत्वाला सर्वोच्च स्थान दिले गेले तरच राष्ट्रवाद औचित्य साधू शकेल.
  • जर आपल्याला अखंड आधुनिक भारत हवा असेल तर सर्व धर्मांच्या धर्मग्रंथांचे सार्वभौमत्व संपवले पाहिजे.
  • मनुष्याने आपल्या आयुष्यात खाणे, पिणे व जगणे ही आयुष्यातील इतिकर्तव्यता मानता कामा नाये. खाणे-पिणे हे जगण्याकरिता व जगणे हे मानमरातबाचे व समाजास भूषणभूत होण्यासाठी समाजसेवेचे असावे.
  • शिक्षित व्हा, चळवळ करा, संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका, ही आमच्या जीवनाची पंचसूत्री.
  • कोणत्याही समाजाची उन्नती त्या समाजातल्या शिक्षणाच्या प्रगतीवर अवलंबून असते.
  • मानवी आयुष्यातील ज्ञान ही पायाभूत गोष्ट आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी आणि टिकावी; तसेच त्यांच्या बुद्धिमत्तेला चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील रहावे.
  • आपण शिकलो म्हणजे सर्वकाही झाले असे नाही. शिक्षणाचे महत्त्व आहे, यात शंका नाही, मात्र शिक्षणाबरोबरच माणसाचे शीलही सुधारले पाहिजे… शीलाशिवाय शिक्षणाची किंमत केवळ शून्य आहे.
  • मुला-मुलींना शिक्षण द्या, परंपरागत कामांत गुंतवू नका.
  • अस्पृश्यतेचे निवारण करण्यासाठी व बहिष्कृत वर्गाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि त्यांना सामावून घेण्यासाठी हिंदुस्तानात आजपर्यंत अनेक महात्म्यांनी प्रयत्न केले. पण प्रत्येकाला अपयश आले. (अनेक) महात्मा आले आणि गेले पण अस्पृश्य हे अस्पृश्यच राहिले.
  • माझे आयुष्य तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरू ‘बुद्ध‘ होत. माझे दुसरे गुरु ‘कबीर‘ आणि तिसरे गुरु म्हणजे ‘ज्योतिबा फुले‘ होत… माझी तीन उपास्य दैवतेही आहेत. पहिले दैवत ‘विद्या’, दुसरे दैवत ‘स्वाभिमान’, आणि तिसरे दैवत म्हणजे ‘शील’ होय.
  • तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही.
  • प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार, सर्वांगिक राष्ट्रीय प्रगतीच्या इमारतीचा पाया आहे…. म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करावा.
  • भाषा, प्रांतभेद, संस्कृती वगैरे भेदभाव मी कधीच पाहू इच्छित नाही. प्रथम हिंदी [भारतीय], नंतर हिंदू किंवा मुसलमान हेही तत्त्व मला पटत नाही. सर्वांनी प्रथम भारतीय, शेवटी भारतीय, भारतीयाच्या पलीकडे काही नको हीच भूमिका घ्यावी.
  • माझे बहुसंख्य हिंदूंना एवढेच सांगणे आहे की आता तुम्ही बहुसंख्य असल्यामुळे जी सत्ता तुमच्या हाती येणार आहे तिचा न्याय व उदार बुद्धीने उपयोग करा. भारत देशाच्या प्रगतीची वाट जर खुंटली, तर त्याची जबाबदारी तुमच्यावर राहील.
  • ज्याला मत असेल त्याने त्या मताचा अमौलिक वस्तू सारखा उपयोग केला पाहिजे. मत म्हणजे ईश्वराने दिलेला ‘संजीवनी मंत्र’ आहे. त्याचा उपयोग केला तरच आपले संरक्षण होईल. स्वाभिमानी जीवनाचा तो एक तरणोपाय आहे, त्याची जोपासना करा.
  • संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर अप्रामाणिक असतील तर ते (संविधान) वाईट ठरल्याशिवाय राहणार नाही. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते जर प्रामाणिक असतील, तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही.
  • जोपर्यंत आपली मने साफ होत नाहीत तोपर्यंत आपल्या दैनंदिन जीवनात नीतिनियमांबद्दल बेपर्वाई आणि गैरवर्तणूक चालूच राहणार. जोपर्यंत माणसाने माणसाशी कसे वागावे हे आपणाला कळत नाही; जोवर माणसामाणसांमध्ये (जातीपातीचे) अडथळे उभे ठाकलेले आहेत, तोपर्यंत या देशाचा विकास होणे कदापि शक्य नाही.
  • संसदेत असलेल्या आपण सर्वांनी (खासदारांनी) जबाबदारीचे भान ठेवले नाही, जनतेच्या हिताची आणि कल्याणाची धुरा आपल्या खांद्यावर घेण्याची तत्परता दाखविली नाही तर एक दिवस असा येईल की, संसदेविषयी आत्यंतिक घृणा निर्माण होईल, याबाबत माझ्या मनात काहीही संदेह नाही.
  • भारतीय लोक आपल्या तत्त्वप्रणालीपेक्षा देशाला मोठे मानतील की देशापेक्षा तत्त्वप्रणालीला मोठे मानतील? मला माहित नाही. परंतु एवढे मात्र निश्चित की जर पक्षांनी स्वत:च्या तत्त्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले, तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित कायमचे घालविले जाईल. या संभाव्यतेच्या विरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हावयाला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे.
  • केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीतसुद्धा परिवर्तन करावयालाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही. सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्त्वे म्हणून मान्यता देतो. 
  • भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल ती किंवा विभूति-पूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल, परंतु राजकारणातील भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३२ पदव्या मिळवल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी, बॅरिस्टर इन लॉ, डीएससी, एलएलडी, डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.

  • पुढल्या जन्मी आपले कल्याण होईल अशा पोकळ वार्तांवर विश्वास न ठेवता या जन्मी व याच काळी आपली सर्वांगीण उन्नती करून घेऊन, मानवी समाजात समानतेचा दर्जा प्रस्थापित करून घ्यावा व हिंदू समाजाला अस्पृश्यतेच्या पापातून मुक्त करावे. 
  • स्वाभिमान-शून्यतेने जीवन कंठणे नामर्दपणाचे आहे. जीवनाकरिता स्वाभिमान जागृत ठेवा. आपला आर्थिक तोटा असला तरी आपण प्रथम आपल्या कर्तव्याला जागले पाहिजे.
  • आपणास दारिद्र का प्राप्त झाले याचा विचार केल्यास, ही अस्पृश्यतेची रूढीच आपल्या दुःखाला कारणीभूत आहे, हे दिसून येईल. यासाठी ज्या उपायांनी आपणास आपला माणुसकीचा हक्क प्राप्त करून घेता येईल, तो प्रत्येक उपाय आपण संघटनेच्या बळावर आणि निर्भयपणे आचरणात आणावा.
  • आपणावर होत असलेल्या अन्यायी जुलमाविरुद्ध बंड पुकारल्याशिवाय आपल्याला खऱ्या माणुसकीचे हक्क प्राप्त होणार नाहीत.
  • अस्पृश्यतेची प्रचलित गुलामगिरी जगातील इतर सर्व गुलामगिरींपेक्षा भयंकर व भीषण असून, एकट्या हिंदू समाजाच्या अगर धर्माच्या मुखावरीलच तो काळाकुट्ट कलंक नसून, अखिल मानवधर्माला व माणुसकीला लांच्छन आहे. आपण हिंदू समाजाचे अभिन्न असे घटक आहोत म्हणून हिंदूच्या प्रत्येक धार्मिक संस्थेत व मंदिरात प्रवेश करण्याचा आपला जन्मसिद्ध हक्क आहे. 
  • आपणाला सामाजिक दर्जा समानतेच्या पायावर मिळवायचा आहे. आपली आर्थिक गुलामगिरी नाहीशी केली पाहिजे.
  • तुम्ही आपली एकी कायम ठेवा. दुभंग होऊ नका. जातिभेद, वर्णभेद, जिल्हाभेद हे वाढवू नका.
  • या जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात आपण काहीतरी करून दाखवायचेच अशी महत्त्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. (लक्षात ठेवा), जे झगडतात तेच पुढे येतात.
  • तुमच्या मतांची किंमत मीठ-मिरचीसारखी समजू नका. तुमच्या प्राणाइतकीच; किंबहुना जास्तच तुमच्या मतांची किंमत आहे, विसरू नका.
  • भलत्याच उमेदवाराला मत द्याल तर खाटकाच्या हातात बकऱ्याने सुरा दिल्यासारखे होईल.
  • आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख धारण करू नका.
  • स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा.
  • लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसांमाणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’.
  • स्वच्छ राहण्यास शिका व सर्व दुर्गुणांपासून मुक्त रहा. तुमच्या मुलांना शिक्षण द्या. हळूहळू त्यांच्या मनात महत्त्वाकांक्षा जागृत करा. ते थोर पुरुष होणार आहेत असे त्यांच्या मनावर बिंबवा. त्यांच्यातील हीनगंड नाहीसा करा. त्यांचे लग्न करण्याची घाई करू नका. (नागपूर, २० जुलै १९४२)
  • घर प्रपंचाच्या अडचणी ज्याप्रमाणे स्त्री आणि पुरुष मिळून सोडवितात त्याप्रमाणे समाजाच्या संसारातील अडचणी स्त्रीपुरुषांनी मिळून सोडवल्या पाहिजे. पुरुषांनी हे काम अंगावर घेतले तर ते पार पाडण्यास त्यांना पुष्कळ अवधी लागेल याबाबत शंका नाही. तेच काम जर स्त्रियांनी अंगावर घेतले, तर त्या कामात लवकर यश:प्राप्ती करुन घेतील.
  • विद्यार्थ्यांनी चाळीचाळीत जाऊन जनतेचे अज्ञान व खुळ्या समजुती दूर केल्या पाहिजेत, तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काहीतरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ परीक्षा पास करण्यासाठीच उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा, प्रगती करण्याकरिता केला पाहिजे; तरच भारत उन्नतावस्थेला जाईल. 
  • माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान तीन शब्दांतच समूर्त झालेले आहे :- स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरू ‘भगवान बुद्ध‘ यांच्या शिकवणीतूनच हे तत्त्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे
  • लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे.
  • महान व्यक्ती आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांमध्ये हा फरक असतो की, महान व्यक्ती समाजाची पाईक होण्यासाठी सदैव तयार असते.
  • हक्क मागून मिळत नसतो त्यासाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो.
  • जेथे माझे वैयक्तिक हित आणि देशहित यांमध्ये संघर्ष होईल तेथे मी देशाच्या हिताला प्राधान्य देईन, परंतु जेथे दलित समाजाचे हित आणि देशहित यांच्यांत संघर्ष होईल तेथे मी दलित समाजाच्या हिताला प्राधान्य देईन.
  • दैवावर (नशिबावर) भरवसा ठेऊन वागू नका, जे काम करावयाचे असेल ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा.
  • अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरींपेक्षा भयंकर व भिषण आहे.
  • स्वतःची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा.
  • चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, समता जनता आणि प्रबुद्ध भारत ही वर्तमानपत्रे सुरू केली होती.

  • उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका.
  • माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.
  • करूणेशिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो.
  • जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज कधीही इतिहास घडवू शकत नाहीत.
  • बुद्धीचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे.
  • पाण्याचा एक थेंब समुद्रामध्ये सामील झाल्याने आपली ओळख गमावतो, त्याच्या विपरीत माणूस ज्या समाजात राहतो त्या समाजातील आपली ओळख गमावत नाही.
  • मी रात्रभर यामुळे जागतो कारण माझा समाज झोपलेला आहे.
  • सामान्यत: कोणताही स्मृतीकार कधीही ही गोष्ट सांगत नाही की आपले सिद्धांत का आहेत आणि कसे आहेत‌.
  • माणूस फक्त समाजाच्या विकासासाठीच नव्हे तर स्वत:च्या विकासासाठी सुद्धा जन्माला आला आहे.
  • नैराश्य हा लोकांना प्रभावित करणारा सर्वात गंभीर प्रकारचा आजार आहे.
  • हिंदू समाज तेव्हाच सामर्थ्यवान होऊ शकेल, जेव्हा तो आपल्या अनिष्ठ रूढी नष्ट करु शकेल आणि स्पृश्यास्पृश्यभेद संपवून समानतेचे व माणुसकीचे वर्तन करू लागेल.
  • पावलागणिक स्वतःच्या ज्ञानात भर टाकित जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते.
  • ग्रंथ हेच गुरू.
  • वाचाल तर वाचाल.
  • मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो.
  • तिरस्कार हा माणसाचा नाश करतो.
  • माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी ज्ञानसागराच्या कडेला गुडगाभर पाण्यात जाता येईल.
  • एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय.
  • आत्मोद्धार हा दुसऱ्याच्या कृपेने होत नसतो. तो ज्याचा त्याने करायचा असतो.
  • विचारक्रांती झाल्याशिवाय आचारात फेरबदल होवू शकत नाही. आचारात फेरबदल करावयाचा झाल्यास आधी मनावर बसलेल्या जुन्या विचारांची छाप काढून टाकने अगदी अगत्याचे आहे.
  • तिरस्कारनीय गुलामगिरी आणि अमानुष अन्याय यांच्या गर्गेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो आहे, त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात जर का मी अपयशी ठरलो, तर स्वत:ला गोळी घालीन!
  • भारतात अनेक जाती अस्तित्वात आहेत. या जाती देशविघातक आहेत. कारण त्या सामाजिक जीवनात तुटकपणा निर्माण करतात.
  • धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय.
  • लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे तर, लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती होय.
  • द्वेषाला सहानूभूतीने आणि निष्कपटतेने जिंका.

 

 

  • बर्फाच्या राशी उन्हाने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात.
  • कायदा व सुव्यवस्था हे राजकीय शरीराचे औषध आहे आणि जेव्हा राजकीय शरीर आजारी पडते तेव्हा औषध दिले गेले पाहिजे.
  • लोक आणि त्यांचे धर्म सामाजिक नैतिकतेच्या आधारावर सामाजिक मानकांनुसार तपासले गेले पाहिजे. जर लोकांच्या हितासाठी धर्म आवश्यक मानला गेला तर इतर कोणतेही मानक अनावश्यक ठरेल.
  • काही लोकांना असे वाटते की समाजासाठी धर्माची गरज नाही. पण हे मत मी मानत नाही. मानवी जीवनात धर्म अत्यंत महत्त्वाचा आहे.
  • आज भारतीय दोन भिन्न विचारसरणींद्वारे संचालित होत आहेत. संविधानाच्या प्रस्तावनेत नमूद केल्याप्रमाणे त्यांचे राजकीय आदर्श स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता यांचे प्रतिपादन करतात, परंतु त्यांच्या धर्मात निहित सामाजिक आदर्श हे नाकारतात.
  • मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.
  • शिका! संघटीत व्हा! संघर्ष करा!
  • शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे.
  • इतिहासकार हा अचूक, प्रामाणिक आणि निष्पक्ष असावा.
  • न्याय नेहमी समानतेची कल्पना तयार करतो.
  • सुरक्षित सैन्य हे सुरक्षित सीमेपेक्षा अधिक चांगले असते.
  • जोपर्यंत आपण सामाजिक स्वातंत्र्य प्राप्त करत नाही तोपर्यंत कायद्याने आपल्याला जे स्वातंत्र्य दिले ते आपल्यासाठी निरर्थक आहे.
  • विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याचा विचार केला पाहिजे.
  • धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार होय.
  • सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येणार नाही.
  • अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनले पाहिजे.
  • मी समाजकार्यात व राजकारणात पडलो तरी, आजन्म विद्यार्थीच आहे.
  • जगात म्हणे, सहा विद्वान आहेत. त्यापैकी डॉ. आंबेडकर एक आहेत असे एक युरोपियन म्हणाले होते.
  • ज्याच्या अंगी धैर्य नाही तो पुढारी होऊ शकत नाही.
  • जात ही एखादी वीटांची भिंत किंवा एखादी काटेरी तार नाही, ज्यामुळे हिंदूंना आपापसात भेट घेता येऊ शकत नाही. जात एक ही एक धारणा आहे, आणि मनाची एक अवस्था आहे.
  • वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मनः संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते.
  • मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते.
  • माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नव्हे; लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची.
  • पती-पत्नीमधील नाते हे जीवलग मित्रांप्रमाणे असले पाहिजे.
  • जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे.