
नवी दिल्ली – राशन कार्ड (Ration Card) हे अतिशय महत्त्वाचे सरकारी डॉक्युमेंट आहे. अनेक सरकारी कामांसाठी तसेच काही खासगी कामांसाठीही राशन कार्डची आवश्यकता असतेच. राशन कार्ड असे डॉक्युमेंट आहे ज्याद्वारे गरीब आणि गरजूंना मोफत किंवा कमी दरामध्ये धान्य मिळतं. राशन कार्डच्या आधारे देशातील कोट्यवधी लोक कमी दरात स्वस्त धान्य दुकानातून, रेशन दुकानामधून धान्य घेतात.
परंतु अनेकदा गरीब-गरजूंची धान्य दुकानात फसवणूक करण्यात येते. राशन धान्य डीलर किंवा रेशन दुकानदारांकडून लोकांच्या फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. अनेकदा धान्य न मिळाल्याचे किंवा वजनात कमी दिल्याचे, गरजूंच्या वाटणीचं धान्य दुसऱ्याच व्यक्तीला धान्य दिल्याच्या घटना अनेकवेळा घडल्या आहेत. हेच पाहता आता सार्वजनिक वितरण विभाग या नियमांमध्ये काही बदल करणार आहे. जेणेकरुन केवळ पात्र लोकांनाच रांशन मिळेल. यामध्ये गरीब आणि गरजूंची फसवणूक होऊ नये हा यामागचा उद्देश आहे.
रेशन-धान्य वितरणाच्या नियमांसंदर्भात सरकार लवकरच काही निर्णय घेणार आहे, त्यासाठी तयारीही सुरू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून राज्य सरकारासोबत अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. यात रेशन-धान्य वितरणाबाबत मागवलेल्या सूचनांवर मसुदा तयार करण्यात आला आहे. यात अशी काही मानकं निश्चित करण्यात आली आहेत, ज्याचा लाभ फक्त पात्र आणि योग्य लोकांनाच मिळेल. रेशन-धान्य वितरणाची प्रक्रिया पारदर्शक करणे हा याचा मुख्य उद्देश आहे.
रेशन-धान्य, शिधावाटप वितरणाच्या नियमांमध्ये बदल झाल्यानंतर आता प्रत्येक व्यक्तीला धान्य मिळणार नाही. कारण जे लोक यासाठी पात्र नाहीत असे अनेक लोक याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे पात्र असलेल्या योग्य व्यक्तीपर्यत हा लाभ पोहोचत नसल्याचेही समोर आले आहे. त्यामुळेच सरकारकडून आता ही पाऊलं उचलली जाणार आहेत. यामुळे आता श्रीमंतांना रेशन-धान्य दिले जाणार नाही.